भाजी भाकरीची पंगत

तामसा येथील भाजी - भाकर प्रसादाचा
५० हजाराहून अधिक भक्तांनी घेतला लाभ


नांदेड(अनिल मादसवार) अनादिकालापासून चालत आलेली तथा सामाजिक समतेचा संदेश देणारी भाजी भाकरीची पंगत तामसा -भोकर रस्त्यावर असलेल्या बारालिंग महादेवाच्या हेमाडपंथी मंदिराच्या अर्चाकांच्या हस्ते अभिषेक पूजनाने संपन्न झाली आहे. या पंगतीत जवळपास ५० हजाराहून अधिक  भाविकांनी भाजी - भाकरीचा स्वाद घेतल्याचे मंदिर समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे. 

नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील तामसा जी.प.गटात असलेल्या बारालिंग महादेव मंदिर तीर्थक्षेत्रावर मकर संक्रांतीच्या करीच्या दिवशी दुपारी १२ वाजता अर्चक रेवनसिद्ध कांठाळे महाराज यांच्या हस्ते नैवेद्य अर्पण करून भाजी - भाकर प्रसाद वाटपास सुरुवात करण्यात आली आहे. येथील अनोखी भाजी - भाकरी पंगत सर्वदूर प्रसिद्ध असून, याचा स्वाद घेण्यासाठी दि.१६ शनिवारी महाराष्ट्र, विदर्भ, तेलंगणा, कर्नाटक, मध्यप्रदेश येथील महादेव भक्तांनी उपस्थिती लावून भाजी - भाकरीचा आस्वाद घेतला आहे. सदर कार्यक्रम यशस्वी रित्या पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांनी गेल्या आठ दिवसपासून तयारी केली होती. सकाळीच मंदिराच्या बाजूला स्वच्छ केलेल्या भाज्या कडईमध्ये टाकून शिजविण्यात आल्या. जवळपास चार ते पाच कढ्या भाजी व कुंटलांशी भाकरी बनविण्यात आल्या होत्या. यासाठी एकराळा, पिंपराळा, तळेगाव, पथराड, शिवपुरी, तामसा, पथराड, आदीसह पंचक्रोशीतील नागरिकांनी भाकरी, भाजीपाला पाठविला होता. 

 यावेळी हदगाव, हिमायतनगर, उमरखेड, महागाव, भोकर, किनवट, उमरी, आदि तालुक्यातील भक्तांनी बरालिंग महादेव दर्शन व प्रसाद ग्रहनासाठी रांगा लावल्या होत्या. या वर्षी मंदिर संस्थांच्या वतीने प्रसाद वाटपासाठी ६ ते ७ खिडक्या बनविल्याने भाविकांना सुरळीत प्रसाद वाटप झाले. विशेषतः महिलांची वेगळी व्यवस्था मंदिर संस्थांच्या पदाधिकार्यांनी केली होती. येणाऱ्या भक्तांना अडचणी निर्माण होऊ नये म्हणून मंदिर संस्थांचे स्वयंसेवक, तथा उपविभागीय पोलिस अधिकारी योगेश कुमार यांनी स्वताहून उपस्थिती लावली आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या माध्यमातून पोलिस बंदोबस्त लावून सर्वाना सुरळीत व शांततेत दर्शन व प्रसाद मिळावा यासाठी परिश्रम घेतले. गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी थंडीच्या कडाक्यामुळे भक्तांची संख्या रोडावलेली दिसून आली. दरम्यान परिसरात वाहनाच्या गर्दीने रस्ते जाम झाल्याने पाई जाणार्या भक्तांना विशेषतः महिला - मुलीना अडचणीचा सामना करावा लागला. दरम्यान तालुक्याचे अनेक नेते मंडळी, कार्यकर्ते व बारालिंग महादेव मंदिर समितीचे विश्वस्त व स्वयंसेवकांनी हि यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी