रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांची मागणी
नांदेड, अनिल मादसवार| रासायनिक खते व सोयाबीनच्या बियाण्यामध्ये व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवावी... अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांनी कृषीअधीक्षक चलवदे यांच्याकडे निवेदन मार्फत केली आहे.
या निवेदनात पांडुरंग शिंदे म्हणाले की, शेतकऱ्याचा सर्वात महत्वाचा खरीप हंगाम सुरू झाला आहे रासायनिक खते बी-बियाण्याच्या खरेदीसाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात बाजारात येत आहे. शेतकरी बाजारात आल्यानंतर आपल्याला हव्या असलेल्या खताची मागणी केल्या नंतर ती खते व्यापाऱ्याकडून दिली जात नाहीत आणि दिली तर त्यासोबत लिंकिंग करून दुसरे खते सुद्धा विक्री केली जात आहे. किंवा वाढीव किमतीमध्ये खताची सर्रास विक्री होत आहे.
तसेच ब्रँडेड खतांऐवजी लोकल मार्केट मधला दर्जाहीन खते शेतकऱ्यांच्या माथी मारण्याचे काम आपल्या जिल्ह्यातील व्यापारी करत आहेत. नवा मोंढा नांदेड तसेच जिल्ह्यातील अनेक ठिकाणी होलसेल विक्रेत्या व्यापाऱ्यांनी ब्रँड कंपन्याच्या सोयाबीनच्या बॅगाच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढवल्या आणि काय दिवसात या ब्रांडेड कंपन्याच्या सोयाबीनच्या बॅगा बाजारातून गायब केल्या आहेत.
कोरोना महामारीच्या काळात सर्वात जास्त स्वतःचे नुकसान होऊन सुद्धा जगाला पोहोचण्याचे काम ज्या शेतकऱ्यांनी केले. त्या शेतकऱ्याची अशाप्रकारे भर दिवसा बाजारात होणारी लूट आपले खाते का थांबत नाही हा मोठा प्रश्न निर्माण झाले आहे. आपल्या खात्याचे भरारी पथक यावेळी कुठे फरार झाले?? आमची आपणास विनंती आहे ही शेतकऱ्यांची होणारी जी लूट आहे ही तात्काळ थांबवावी. व शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे व खते सहज व योग्य दरात उपलब्ध करून द्यावे.
अन्यथा रयत क्रांती संघटना कायदा हातात घेऊन या गोष्टीला चाप लावेल. अन होणाऱ्या परिणामाला आपले खाते जबाबदार असेल असे पांडुरंग शिंदे म्हणाले. यावेळी जिल्हाध्यक्ष विनोद वंजारे,ओबीसी जिल्हाध्यक्ष बालाजी पांचाळ,आनंद लोंढे,शंकर सावळे व शेतकरी इत्यादी उपस्थित होते. या निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी नांदेड.जिल्हा कृषी विकास अधिकारी,जि.प.नांदेड.यांना देण्यात आले.