उस्माननगर, माणिक भिसे| उस्माननगर येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या मागील मोकळ्या जागेत सरपंच श्रीमती गयाबाई घोरबांड यांच्या अध्यक्षतेखाली प्रधानमंत्री आवास योजना प्रपत्र" ड" च्या घरकुल यादी वाचनासाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते.
यादी वाचन झाल्यानंतर गावकऱ्यांच्या प्रश्नाच्या दरम्यान गदारोळ झाल्याने ग्रामसभा आटोपून तहकूब करण्यात आली. या ग्रामसभेला सभापती सौ. लक्ष्मीबाई घोरबांड, विस्तार अधिकारी कोठेवाड , उपसरपंच बाशीदभाई शेख,यांच्यासह मोजक्या ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत विशेष ग्रामसभा बोलावण्यात आली होती.
त्यात प्रधानमंत्री आवास योजना प्रपत्र 'ड' च्या घरकुल यादीचे वाचन करण्यात आले.उस्माननगर येथे घेण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत प्रधानमंत्री आवास योजनेच्या प्रपत्र 'ड' च्या ६६६ लाभार्थ्यांच्या यादीचे वाचन करण्यात आले. या ग्रामसभेत अपात्र लाभार्थी, पक्की घरे असलेले, दुबार लाभ घेणारे अशा शासनाच्या विविध १३ नियमांचा विचार करून चर्चेद्वारे पात्र लाभार्थ्यांची निवड करून ती यादी मंजुरीला पाठविणे अपेक्षित होते. परंतु पहिल्या यादीतील १३० लाभार्थ्यांना अपात्र का ठरविले ही विचारणा करताच सभेमध्ये आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली.
सभेत गदारोळ सुरू होऊन त्यातच यादीचे वाचन करण्यात आले. ग्रामसेवक यांनी अनेक वेळा विनंती करूनही नागरिकांनी व्यासपीठाला घेराव घातला. त्यामुळे वगळलेले १३० लाभार्थी, नवीन यादीतील ६६६ लाभार्थी आणि ऑनलाइन करूनही यादीत नाव आले नाही. अशा सर्वांची नावे एकत्र करून ती यादी शासनाकडे पाठवण्यात येईल ,असे सांगून ग्रामविकास अधिकारी सौ. शिंदे यांनी अध्यक्षांच्या परवानगीने ग्रामसभा तहकूब करण्यात आली असल्याचे सांगून ग्रामसभा आटोपून घेतली.
गावची ग्रामसभा ही लोकसभा व विधानसभा प्रमाणे गावाचे विधिमंडळ असते. गावाच्या विकासासाठी ग्रामसभेला सर्वाधिकार देऊन सक्षम बनवण्यात आले आहे. ग्रामसभेत पारित झालेल्या ठरावाला शासन दरबारी अनन्यसाधारण महत्त्व आहे. ग्रामसभा घेण्याचीही एक पद्धत असते. चर्चेच्या विषयाला क्रम असतो. आज रोजी घेण्यात आलेल्या ग्रामसभेत मागील सभेचा वृत्तांत वाचन करणे, मागील जमा खर्चास मान्यता देणे, जन्म-मृत्युच्या नोंदी चे वाचन करणे असा क्रम असून त्यानंतर प्रपत्र 'ड' यादीचे वाचन करणे व त्यानंतर आगामी काळात येणाऱ्या अडचणी, नाल्या, रस्ते, पाणी, लाईट संबंधित तक्रारी अशा आयत्या वेळी च्या विषयी चर्चा होईल अशी अपेक्षा होती.
परंतु एकमेव घरकुलाच्या विषयावर गदारोळात केवळ यादीचे वाचन करून इतर विषयांना फाटा देत आज पर्यंतच्या ग्रामसभांच्या स्थानिक अलिखित नियमाप्रमाणे गदारोळातच ग्रामसभा तहकूब करुन आटोपून घेण्यात धन्यता मानत आहेत.उस्माननगर ग्रामपंचायत ही 15 सदस्यांची असून ग्रामसभेला महीला सदस्य व पुरुष सदस्यांची अनुपस्थिती दिसून आल्याने अनेक जणांनी नाराजी व्यक्त केली.