शिवसेनेला मंगरूळ सोसायटीच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला
हिमायतनगर, अनिल मादसवार| तालुक्यातील मंगरूळ येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीसाठी मतदान संपन्न झाले. त्यानंतर लगेच मतमोजणी होऊन निकाल घोषित झाला. यावेळी धक्कादायक निकाल हाती आला असून, कांग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मी बाबुराव गटाच्या १३ पैकी १३ उमेदवारांनी जबरदस्त विजय मिळून विरोधकांचा धोबी पछाड केले आहे. या विजयाची बातमी पसरताच सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. या सर्व उमेदवारांनी आ.माधवराव पाटील जवळगावकर यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविल्याने शेतकरी विकास पॅनलचा विजय झाला असून, शिवसेनेला मात्र मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
हिमायतनगर तालुक्यातील सेवा सहकारी ओसायट्याच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरूच असून, नुकतेच कार्ला येथील सहकारी सोअसायटीवर शिवसेनेचा भगवान फडकला. त्यानंतर मंगरूळ सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मी बाबुराव गट यांच्या एकत्र युतीने येथील निवडणूक पार पडली. तर विरोधी गट म्हणून शिवसेनेने स्वतंत्र पॅनल उभे केले होते. त्यामुळे हिमायतनगर शहराच्या सोसायटी निवडणुकीप्रमाणे येथे प्रचार झाला. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारते याकडे सर्वांचे लक्ष होते.
मंगरूळ सेवा सहकारी सोसायटीच्या १३ जागेसाठी निवडणुकीसाठी दि. २३ फेब्रुवारी बुधवारी सकाळ पासून सायंकाळ पर्यंत मतदान झाले. त्यानंतर मतमोजणी सुरु झाली, अत्यंत चुरशीत झालेल्या या निवडणुकीत कोणाचा बोलबाला राहील..? याकडे सर्व तालुका वासियांचे लक्ष लागून होते. सायंकाळी मतमोजणी संपन्न होऊन हाती आलेला निकाल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घोषित केला. यामध्ये शेतकरी विकास पॅनलचे १३ पैकी १३ उमेदवार विजयी झाले आहेत. विजयी उमेदवारामध्ये माजी सरपंच सुभाष जक्कलवाड, शिवाजीराव कदम, दत्तलाल जयस्वाल, ग्यानू पावडे, सौ. जमुनाबाई ताडेवाड, रंदुसिंह राठोड, गजानन शिरफ़ुले, प्रभाकर बाचकलवाड, मारोती सोमनवाड, संतोष आंबेकर, रेणुकाबाई पुप्पलवाड, प्रवीण जाधव, मारोती बलपेलवाड आदींचा समावेश आहे.
जुन्या शिवसैनिकांना डावलले गेल्यामुळे शिवसेनेचा पराभव झाला - जुन्या शिवसैनिकांना डावलले गेले आणि विश्वासात ना घेता उमेदवार निवडण्यात आले होते. त्यामुळे त्यांनी काँग्रेस सोबत युती करून मंगरूळ येथील सेवा सहकारी सोसयटीची निवडणूक लढविली. त्यामुळे शिवसेनेला धोबीपछाड व्हावे लागले असे, असाच प्रकार आगामी निवडणुकीत सुरु राहिला तर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीतही शिवसेनेला दारुण पराभवाचा सामना करावा लागेल अशी प्रतिक्रिया बाबुराव गटाचे शिवसैनिक तथा खैरगावचे माजी सरपंच राजेश जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
तालुक्यात ५ वर्षाच्या कार्यकाळानंतर झालेल्या १२ सोसायटीच्या निवडणुकांची रणधुमाळी आगामी नगरपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची रंगीत तालीम असल्याने या सोसायटीच्या निवडणुका आपल्या ताब्यात राहाव्यात यासाठी शिवसेना-काँग्रेस पक्षाच्या मातब्बर नेत्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. यात कुठं यश तर कुठं अपयशाचा सामना या दोघांनाही करावा लागला आहे. सर्वात मोठी सोसयटी असलेल्या हिमायतनगर येथील सोसायटीत काँग्रेस पक्षाच्या पैनलला अति आत्मविश्वास पराभवाचे कारण ठरले आहे. तर हाच कित्ता मंगरूळ सोसायटीत शिवसेनेने गिरवित हिमायतनगरची सोसायटी आमच्या हातात आली, आता कुणाच्याही कुबड्याशिवाय आम्हीच सरस आहोत असा अविर्भाव ठेऊन निवडणूक लढविल्याने मंगरूळ सोसायटीच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होते आहे.
मंगरूळ येथील सोसायटीच्या निवडणुकीत 13 पैकी 13 उमेदवार विजयी झाल्याबद्दल काँग्रेस, राष्ट्रवादी, बाबुराव कदम कोहळीकर समर्थकांनी एकच जल्लोष करत विजयी उमेदवारांची मिरवणूक काढली. ये तो झांकी है... अभि हिमायतनगर नगरपंचायत, जिल्हा परिषद बाकी है... असे म्हणत गुलालाची उधळण करत आनंद व्यक्त केला आहे. तर विजयी झालेल्या या सर्व उमेदवारांच आ. माधवराव पाटील जवळगावकर, दशरथ गोसलवाड, माजी जी.प.सदस्य सुभाष राठोड, राजेश जाधव खैरगावकर यांनी अभिनंदन करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.