नांदेड| नांदेड जिल्हा परिषदेतंर्गत सेवानिवृत्त झालेले शिक्षक व कर्मचारी तसेच आगामी सहा महिन्यात सेवानिवृत्त होणारी जिल्हा परिषद शिक्षक व कर्मचारी यांचे निवृत्ती विषयक तक्रारी ऐकून घेऊन, त्यावर कार्यवाही करण्यासाठी जिल्हा परिषदच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात सोमवार 28 फेब्रुवारी 2022 रोजी दुपारी 3 ते 5 यावेळेत पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या पेंशन अदालतीत संबंधित विभागाचे खातेप्रमुख तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे हे उपस्थित राहून सर्व प्रकारच्या प्रलंबित प्रकरणाचा आढावा घेणार आहेत. यावेळी शक्यतोवर त्या-त्या प्रकरणांचे जागेवरच निराकरण केले जाईल.
प्रलंबित प्रकरणांमध्ये विभागीय चौकशी, मा. न्यायालयीन प्रकरणे, सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन निश्चिती प्रकरणे, वारसा हक्काचे प्रकरणे, तसेच इतर कारणांमुळे प्रलंबित प्रकरणे यांचा प्रामुख्याने आढावा घेऊन प्रकरणे निकाली काढण्यात येतील. तसेच याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे ह्या उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. संबंधितांनी पेंशन अदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे यांनी केले आहे.