राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला उत्स्फुर्त प्रतिसाद -NNL


नांदेड|
जिल्ह्यात आज राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला. तुप्पा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे व जिल्हा परिषद सदस्य  गंगाप्रसाद काकडे यांच्या हस्ते बालकांना पोलिओ लसीचा डोस पाजवून जिल्हास्तरीय राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा प्रातिनिधीक शुभारंभ करण्यात आला. यावेळी सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ.अमृत चव्हाण, नांदेडचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रविण मुंडे,वैद्यकिय अधिकारी डॉ.बालाजी राठोड, तुप्पा येथील सरपंच श्रीमती मंदाकिनी यन्नावार,पंचायत समिती सदस्य श्री सुनिल पवार,माजी सरपंच श्री देवराव टिप्परसे, पोलीस पाटील अजमोद्दिन शेख, तसेच जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी सुभाष खाकरे, औषध निर्माण अधिकारी अविनाश देशमुख, प्रा.आ.केंद्रातील श्रीमती अरुणा बेंडला, श्रीमती मंगल बैनवाड उपस्थित होते. 

नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 2 लक्ष 52 हजार 916 व शहरी भागातील 1 एक 52 हजार 431 असे एकुण 4 लक्ष 5 हजार 347 अपेक्षित लाभार्थींचे पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत पोलिओची लस पाजवून लसीकरण करण्यात येणार आहे. या करीता जिल्ह्यात ग्रामीण भागातील 2 हजार 236 व शहरी भागातील 534 असे एकुण 02 हजार 770 बूथ स्थापन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील 5 हजार 709 व शहरी भागातील 1 हजार 556 असे एकुण 07 हजार 265 इतके मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच बसस्थानके, रेल्वेस्टेशन या ठिकाणी लस उपलब्ध करुन देण्यासाठी 257   ट्राझिंट टिम कार्यन्वित करण्यात आल्या आहेत. 

उसतोड कामगारांच्या व विटभट्टी वरील कामगारांच्या मुलांना लस देण्याकरीता 184 मोबाईल टिम कार्यन्वित करण्यात आल्या आहेत. या मोहिमेमध्ये बायोव्हायलंट (bopv) लसीचा वापर करण्यात येणार असून,कोविड-19 उद्रेकाच्या अनुषंगाने नियमित लसीकरणासाठी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करुन पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविली जात असून सर्व पालकांनी आपल्या 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकास पोलिओ लसीचा डोस अवश्य पाजवून घ्यावा असे आवाहन याप्रसंगी माहिती देताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे यांनी केले आहे.

मोहिमेच्या दिवशी पोलिओच्या लसीपासून वंचित राहीलेल्या बालकांसाठी ग्रामीण भागात 3 दिवस आणि शहरी भागात 5 दिवस घर भेटीव्दारे (आय.पी.पी.आय.) पोलिओ लस पाजविण्यात येणार आहे. जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम यशस्वीरित्या राबविण्यासाठी आरोग्य विभागातील अधिकारी अति.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी, माताबाल संगोपन अधिकारी डॉ.शिवशक्ती पवार, साथरोग अधिकारी डॉ.अनिल रुईकर तसेच सर्व तालुका आरोग्य अधिकारी,वैद्यकिय अधिकारी व सर्व संवर्गातील आरोग्य कर्मचारी परिश्रम घेत आहेत. 

जागतिक आरोग्य संघटनेने 1988 मध्ये पोलिओ निर्मुलनाचे ध्येय निश्चित केले असून  सन 1995 पासून पोलिओ लसीकरण मोहिम संपुर्ण देशात राबविण्यात येत आहे. देशात 13 जानेवारी 2011 नंतर एकही पोलिओचा रुग्ण आढळला नाही. 7 मार्च 2014 मध्ये आपल्या देशास पोलिओ निर्मुलन झाल्याचे प्रमाणपत्र मिळाले आहे.

 

 


 

 


 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी