हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर शहरात ओमायक्रॉनचे तीन रुग्ण बाधित आढळल्यामुळे लसीकरणाला वेग आला आहे. दररोज शेकडो नागरिक हिमायतनगर येथे लस घेण्यासाठी येत आहेत. आज बुधवार दि.०५ जानेवारी रोजी एक ९२ वर्षीय आजीबाईच्या दुसरी लस घेऊन नागरिकांनाही लस घेण्याचे आवाहन केले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर लसीकरणाबद्दल शासन स्तरावरून मोठ्या प्रमाणावर नागरिकात जागरुकता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढू लागल्याने आणि कोरोनाच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने जिल्हाभरात मोठ्या संख्येने लसीकरण करुन घेण्यासाठी लस केंद्रावर नागरिक जात आहेत. लसीकरण हाच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखायचा एकमेव पर्याय आहे.
आजच्या तारखेपर्यंत हिमायतनगर शहरात १२ हजार २२५ नागरिकांनी पहिला डोस तर ८ हजार ६ लोकांनी दुसरा डोस असे एकूण २० हजार ३०१ हिमायतनगर शहरातील नागरिकांनी लस घेतली आहे. आज दि.०५ जानेवारी रोजी ९२ वर्षीय आजीबाईसह पहिला डोस - २६ आणि दुसरा डोस ४६ नागरिकांनी घेतला आहे. तर आज १४ वर्षा नंतरच्या ९ युवकांनी लस घेतली असून, एकूण ८१ जणांनी लसीकरण घेतले असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक गायकवाड व डॉ.जाधव यांनी दिली.
हिमायतनगर शहरातील ग्रामीण रुग्णालयात आज ९२ वर्षांच्या आजीबाईंनी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला आहे. गंगाबाई संभाजी हनवते असे या आजींचे नाव आहे. त्या आजीने दुसऱ्या लसीचा दोन घेऊन स्वतःला तर सुरक्षित केले, आणि त्यांनी नागरिकांनाही आपल्यासह कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी लस घेण्याचे आवाहन केले आहे.
आम्ही अनेक वेळा शहर व तालुक्यातील जनतेला लसीकरणाबाबत आवाहन केलं आहे. एवढेच नव्हे तर घरोघरी जाऊन लसीकरणाचा सर्वे करण्यात आला आहे. अनेकांनी आमच्या आवाहनाला प्रतिसाद दिलाय मात्र बहुतांश नागरिक अद्यापही कोवीड लस घेण्यासाठी साशंक आहेत. अश्या नागरीकासाठी हिमायतनगर येथील या ९२ वर्षांच्या आजीबाईंनी लस घेऊन एकप्रकारे सकारात्मक संदेश दिला आहे. नागरिकांनी व युवकांनी कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरण करून घ्यावं असं आवाहनही हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.देविदास गायकवाड यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिली.