भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्यास 28 फेब्रुवारी पर्यत मुदतवाढ - NNL


नांदेड|
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थी शासकीय प्रवेशास पात्र असुन प्रवेश मिळालेला नाही. अशा विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक रक्कम देण्यात येते. ही रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जाचा विहित नमुना http://sjsa.maharashtra.gov.in किंवा http://maharashtra.gov.in संकेतस्थळवर उपलब्ध आहे. पात्र विद्यार्थ्यांनी 28 फेब्रुवारी 2022 रोजी कार्यालयीन वेळेपर्यंत, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, ग्यानमाता शाळेसमोर, नमस्कार चौक, नांदेड येथे अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे, सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले आहे.

 योजनेच्या अटीं व शर्ती तसेच अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रांची यादी संकेतस्थळावर उपलब्ध आहे. नांदेड महानगरपालिका क्षेत्रामध्ये तसेच नांदेड महानगरपालिकेच्या हद्दीपासून 5 कि.मी.परिसरातील महाविद्यालये, शैक्षणिक संस्था या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुज्ञेय रक्कम व खर्चाची बाब पुढीलप्रमाणे आहे.  भोजन भत्ता 28 हजार, निवास भत्ता 15 हजार, निर्वाह भत्ता 8 हजार,  प्रति विद्यार्थी एकुण देय रक्कम 51 हजार. वरील रकमेव्यतिरिक्त वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रति वर्ष रुपये 5 हजार व अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रति वर्ष 2 हजार रुपये इतकी रक्कम शैक्षणिक साहित्यासाठी ठोक स्वरुपात देण्यात येईल. वरील एकुण देय रक्कमेतून भारत सरकार शिष्यवृत्ती अंतर्गत दिला जाणारा निर्वाह भत्ता कपात करण्यात येईल.

 विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावा. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. विद्यार्थी कोणत्याही शासकीय वस्तीगृहात प्रवेशित नसावा. शासकीय वस्तीगृहात प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास  विद्यार्थ्याने प्रवेश  घेतलेला असावा. विद्यार्थ्यास इयत्ता 10 वी व 12 वी,पदवी,पदविकामध्ये किमान 50 टक्के पेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे. या योजनेमध्ये दिव्यांग (अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील) विद्यार्थ्यांसाठी 3 टक्के आरक्षण असेल व गुणवत्तेची मर्यादा 40 टक्के असेल. विद्यार्थ्याच्या पालकाचे उत्पन्न 2 लाख 50 हजारापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्याने ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे तेथील स्थानिक रहिवाशी नसावा. याप्रमाणे निकष आहेत.

 या योजनेचा लाभ घेण्यासाठी नांदेड महानगरपालिका क्षेत्रामध्ये असलेली महाविद्यालये तसेच नांदेड महानगरपालिका हद्दीपासून 5 कि.मी. परिसरात असलेली महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनीच अर्ज करावा. विद्यार्थ्याने ज्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतला आहे तो अभ्यासक्रम हा दोन वर्षापेक्षा कमी कालावधीचा नसावा.  विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील उपस्थिती 75 टक्के पेक्षा जास्त असणे बंधनकारक असेल. विद्यार्थ्यांची निवड विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल. या योजनेसाठी खास बाब सवलत लागु राहणार नाही.

 विद्यार्थ्याने खोटी माहिती अथवा कागदपत्रे देऊन लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण न केल्यास अथवा नोकरी व व्यवसाय करत असल्यास आणि इतर मार्गाने या योजनेचा लाभ घेऊन गैरवापर केल्याचे  निदर्शनास आल्यास तो कार्यवाहीस पात्र राहील तसेच त्यास दिलेल्या रक्कमेची 12 टक्के व्याजासह वसुली करण्यात येईल. अपुर्ण भरलेले, आवश्यक कागदपत्र सादर न केलेले अर्ज रद्द समजण्यात येतील. अपात्र, त्रुटी असलेल्या विद्यार्थ्यांना वेगळे कळविण्यात येणार नाही यांची नोंद विद्यार्थ्यांनी घ्यावी, असेही समाज कल्याण कार्यालयाने कळविले आहे.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी