आजचा तरुण: शिक्षण आणि व्यसन -NNL


भारत देशाची आज महासत्तेच्या दिशेने वाटचाल चालू असताना २१ व्या शतकात खऱ्या अर्थाने तरुण हा देशाच्या केंद्रस्थानी आहे. जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या देशाच्या यादीमध्ये विकिपीडियाच्या- २०२१ च्या माहितीनुसार भारताचा दुसरा क्रमांक लागतो.(१३५ कोटी ५३ लाख ५० हजार ) जगात भारताची ओळख 'तरुणाईंचा देश' म्हणून होत आहे.

             
भारताने विज्ञान-तंत्रज्ञानात खूप मोठ्या प्रमाणात प्रगती केलेली असून भारत देश हा विशाल खंडप्राय विविध जाती धर्मांने, रुढी, परंपरेने नटलेला आहे. भारत देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास ७४ वर्षे पूर्ण झाली झालेली असून ७५ व्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवी वर्षांत पदार्पण करीत आहोत. आझादी का "अमृत महोत्सव" आज आपण देशभर भव्य दिव्य स्वरूपात साजरा करीत असताना जगाच्या पाठीवर भारत देश हा महासत्ता म्हणून उदयास येताना या देशातील आजच्या तरुणांची दशा आणि दिशा काय आहे ? याचं विचार मंथन,संशोधन होणे आवश्यक आहे. 

भारत देश संविधानानुसार मार्गक्रमण करीत असताना आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवित असतांना त्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता प्राप्त करून देत असतांना आजची तरुणाई कोठे आहे. याचे चिंतन,मनन, शोधन वर्तमान समाजामध्ये होणे आवश्यक वाटते. 
                   
एकीकडे या देशाच्या विकासाचा केंद्रबिंदू तरुण असताना तरुणांचा देश म्हणून जगात ओळख निर्माण होत आहे. परंतु आजचा तरुण कोठे चाललाय? त्याची व्यथा आणि दिशा काय आहे ? तरुणांच्या शिक्षणाचा दर्जा काय आहे ? तरुणांचे आरोग्य व व्यसन कोणत्या टप्प्यावर आहे. असे एक ना अनेक प्रश्न समाजांमध्ये निर्माण होत आहेत. याची उकल क्रमप्राप्त असताना समाज माध्यम व राज्यकर्ते पूर्णतः डोळेझाक करताना दिसून येत आहेत. शिक्षणाच्या सार्वत्रिक कायद्यानुसार सर्वांना दर्जेदार शिक्षण मोफत आणि सक्तीचे असताना या देशात खरंच शिक्षण मोफत मिळत आहे का ? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनाला पडतो. महागडी ठरत चाललेली शिक्षण व्यवस्था आणि शिक्षण प्रणाली हे सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकरी, श्रमकरी मध्यमवर्गीयांना परवडणारी आहे का ?  सर्वसामान्यांच्या पोरांना दर्जेदार शिक्षण, उच्च शिक्षण हे तर कोसोदूर आहे.
                
दरवर्षी देशाच्या अर्थसंकल्पात शिक्षण व्यवस्थेवर कोट्यवधी रुपयांची तरतूद करूनही शेतकऱ्यांच्या, कष्टकरी, मध्यमवर्गीय  कुटुंबाच्या पोरांना शिक्षण घेणे खूप आर्थिक अडचणीचे ठरत आहे. अनेक तरुणांना अर्ध्यावरच शिक्षण सोडण्याची वेळ येत आहे. जिद्दीने,अपार कष्टाने शिक्षण पूर्ण करूनही नोकरी,रोजगार मिळेल याची शाश्वती नाही. देशांमध्ये प्रचंड बेकारीचे प्रमाण वाढत आहे. तरुणांच्या हाताला काम नाही,कसल्याही प्रकारचा रोजगार नाही, नोकरी मिळणे तर खूप कठीण झालेले आहे. शिक्षणाच्या प्रत्येक क्षेत्रात बेकारींचे प्रचंड प्रमाण वाढत आहे. तरुणाईंची ऐन उमेदीची वर्ष शिक्षण पूर्ण करण्यासाठी जात आहेत. 

तर शिक्षण घेतलेल्या तरुण-तरुणींना नोकरी रोजगाराच्या संधीचे प्रमाण अत्यल्प आहे. शिक्षण घ्यावं तर कोणतं ? शाखा निवडावी तर कोणती ?  कला, वाणिज्य, विज्ञान या शाखेतील कोणत्या डिग्रीला मार्केटमध्ये मागणी व किंमत आहे. या विचार गर्तेत पालक-विद्यार्थी पुरता अडकलेला आहे. खाजगी संस्थेची किंवा प्रायव्हेट ट्युशनची हजारो-लाखो रुपयातील फीस पालकांनी कशी भरायची ? इकडून-तिकडून, आहे नाही ते सर्वस्व पणाला लावून मुलांना शिकवलं तर मुले बेकारीच्या लाटेत उभे राहतात की नाही याची कोणालाही खात्री देता येत नाही. बेकार तरुणाई ही वैफल्य, नैराश्यातून व्यसनाच्या आहारी व वाम मार्गाला जात आहे. 
             
आपण कितीही व्यसनमुक्तीचे उपक्रम राबवले तरीही तरुणांच्या व्यसनाधिनतेचे प्रमाण या देशात दिवसागणिक वाढताना दिसत आहे. देशातील हल्ली असंख्य तरुणाई ड्रग्ज, चरस, कोकीन, ब्राउन शुगर व मद्यासह आम्ली पदार्थांच्या आहारी जात आहे. वेगवेगळ्या पार्ट्या रेव्ह व इतर पार्टी संस्कृती उदयास आलेली आहे.यातून चोरी, लुटमार,बलात्कार, खून अशा अमानवीय, निंदनीय, देशाला काळिमा फासणारया घटना या देशात घडत आहेत. या घटनांचे प्रमाण राजरोसपणे वाढत आहे. हे देशाला परवडणारे नाही. 

देशाचा कणा असलेली तरुणाईं अशी उध्वस्त होत असेल ? तर मग  शिक्षण व्यवस्थेत काही दोष आहेत का ? किंवा केजी ते पीजी पर्यंतच्या शिक्षणातील नितीमूल्ये व कौटुंबिक संस्काराची पेरणी करण्यात आपण कमी पडत आहोत का ? व्यसनमुक्तीची केंद्रेही शोभेची वस्तू म्हणून उभी राहून प्रबोधनाचा जागर हा कृतिशून्य तर ठरत नाही ना ? आजची तरुणाई मन, बुद्धी, ज्ञानेंद्रिये आणि कर्मोंद्रिय या सर्वांनी युक्त अशी संपूर्ण विवेकशील, समग्र व्यक्तिमत्त्वाची तयार झाली तरच खऱ्या अर्थाने जागतिक महासत्तेच्या स्पर्धेत तरुण भारत देश टिकेल ! अन्यथा भारताचे मिसाईल मॅन,दिवंगत माजी राष्ट्रपती भारत रत्न डाॅ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी पाहिलेले भारताच्या महासत्तेचे स्वप्न दिवा स्वप्न ठरेल.

लेखक, रमेश पवार, व्याख्याते-बहीशाल शिक्षण केंद्र स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड 
दुरभाष क्रमांक : ७५८८४२६५२१

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी