वारंगटाकळीत उसाच्या फडाला आग; २ एकरातील उस जळाल्याने लाखोचे नुकसान -NNL


हिमायतनगर|
तालुक्यातील मौजे वारंगटाकळी येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील उसाच्या फडाला दि.१६ डिसेंबरच्या सायंकाळी अचानक आग लागली. या आगीत दोन एकराचा उस जळून खाक झाला आहे. सदर युवा शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले असून, या घटनेचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळवून द्यावी. अशी रास्त मागणी शेतकऱ्याने निवेदन देऊन केली आहे. तसेच कारखान्याने उर्वरित ऊस तातडीने न्यावा अशी विनंतीही त्यांनी केली आहे.  घटनेत शेतकरी, युवकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केल्याने आग आटोक्यात आली. अन्यथा परिसरातील हजारो हेक्टर शेतीतील उसाला आग लागून मोठी हानी झाली असती.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, हिमायतनगर तालुक्यातील मौजे वारंगटाकळी येथील चक्रधर आबाराव जोगदंड यांच्या नावाने गट क्रमांक १६४ मध्ये १ हेक्टर ४० आर शेती आहे. या वर्षीच्या खरीप हंगामात शेतीतील कापूस, सोयाबीन नुकसानीत आले असून, ८० आर जमिनीत उसाची लागवड १७ जानेवारी २०२१ मध्ये केली आहे. नदीकाठी शेत असल्याने उपलब्ध पाणी साठ्यातून ऊस जगविण्याचा प्रयत्न केला. आता ऊस तोडणीसाठी आला असताना दि.१६ डिसेंबरच्या सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्यामुळे २ एकरातील उसाचा फड जळून खाक झाला आहे.


उसाने पेट घेतल्याची माहिती शेजारच्या शेतकर्याने देताच १५ ते २० तरुणांना घेऊन युवा शेतकऱ्याने आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. आगीचे लोट जास्त असल्याने एकीकडे ऊस विझवीत असताना दुसरीकडे ऊस पेट घेत असल्याने ८० आर जमीतील ऊस जाळून खाक झाला आहे. वर्षभर उस वाढविण्यासाठी केलेली मेहनत काही तासात आगीच्या कहराने वाया गेली असून, या घटनेमुळे माझे ३ लाखाचे नुकसान झाल्याचे शेतकर्याचे म्हणणे आहे. या घटनेची माहिती तलाठी व पोलिस स्थानकास देण्यात आली असून, सदर नुकसानीचा तातडीने पंचनामा करून भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी युवा शेतकरी चक्रधर जोगदंड यांनी केली आहे. तसेच ऊस जाळून नुकसान झाल्याबद्दल उर्वरित ऊस सुभाष शुगर प्रा.ली.हडसनी यांनी तातडीने घेऊन जावा अशी विनंती अर्ज कारखान्याकडे करण्यात आल्याचे शेतकऱ्याने सांगितले.

वारंगटाकळी हे पैनगंगा नदीच्या काठावर आहे. त्यामुळे या भागातील बहुतांश शेतकरी उसाचे पीक घेतात, दि.१६ च्या रात्रीला लागलेल्या आगीमुळे अनेक शेतकरी भयभीत झाले होते. काही शेतकरी व १५ ते २० युवकांना चार ते पाच तासाच्या अथक प्रयत्नाने आग विझविण्यात यश आले. त्यामुळे शेजारच्या अन्य शेतकऱ्याच्या उसाचे होणारे नुकसान टळले आहे. अन्यथा या भागात असलेल्या शेकडो हेक्टर शेतातील शेतकऱ्यांच्या ऊस देखील आगीच्या भक्षस्थानी सापडून मोठे नुकसान झाले असते अशी माहिती माजी सरपंच आबाराव जोगदंड यांनी देऊन आग कश्यामुळे लागली याचा तपास होणे गरजेचे असल्याचे म्हंटले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी