उद्योगवाढीमुळे रोजगार मिळेल- अशोकराव चव्हाण
नांदेड एमआयडीसी क्षेत्रातील अग्निशमन संकुलाच्या उद्धाटन प्रसंगी अशोकराव चव्हाण बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री डी. पी. सावंत हे होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, आ. ओमप्रकाश पोकर्णा, आ. अमरनाथ राजूरकर, महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालक मिलींदकुमार देशमुख, एमआयडीसीचे मुख्य अभियंता पी. जे. रंगारी यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्योगमंत्री असतांना सन 2006 साली राज्यातील अग्निशमन केंद्रासाठी घेतलेल्या निर्णयाची फलश्रृती आता पहावयाला मिळते आहे, अशी स्मृती जागवित माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण म्हणाले की राज्यातील 285 तालुक्याच्या ठिकाणी अग्निशमन सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी निधी देण्यात आला होता. अद्यापही नांदेड जिल्ह्यातील काही तालुक्यात अग्निशमनदल स्थापन झाले नाहीत, अशा ठिकाणी जमीनधारकांनी जमीन उपलब्ध करुन दिल्यास अग्निशमन संकुल कार्यान्वित केले जातील.
दिवसेंदिवस पाण्याचा प्रश्न बिकट होत चालल्याने शहरातील सांडपाण्याचा रिसायकलींगने उद्योगधंदासाठी वापर होऊ शकतो, असे सांगत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण म्हणाले की शिवाजीनगर उद्योग वसाहतीत उद्योग भवन सुंदररित्या बांधण्यात आले आहे. उद्योग विभागाने फर्निचरचे काम पूर्ण करुन उद्योगभवनाचे लोकार्पण करावे.अध्यक्षपदावरुन बोलतांना पालकमंत्री डी. पी. सावंत म्हणाले की, अग्निशमन दलाचे महत्व वाढत चालले आहे. सार्वजनिक इमारतीमध्ये अग्निशमन साधने उपलब्ध करुन दिली जात आहेत. आता फायर ऑडीट झाल्याशिवाय व ते पूर्ण केल्याशिवाय सार्वजनिक इमारतीचे बांधकाम पूर्ण होत नाही. अग्निशमन सेवा जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी पुरविण्याचा प्रयत्न राहील. मारतळा येथे नियोजित वसाहतीसाठी भरपूर पैसा लागत असल्याने जिल्ह्यातील जागोजागी प्लॉटधारक उद्योजकांनी उद्योग कार्यान्वित केले पाहिजेत.
अग्निशमन संचालक मिलींद कुमार देशमुख यांनी जीवीत व वित्त हानी रोखण्याचा संकल्प असून राज्यात 100 तालुक्यात अग्निशमन दल नाहीत तेथे उपलब्ध करुन देण्यासाठी पाऊले उचलली जातील असे सांगितले तर मुख्य अभियंता पी. जे. रंगारी यांनी राज्यात उद्योग धंदासाठी जवळपास 57 हजार हेक्टर जमीन संपादीत करण्यात आली असे सांगितले. यावेळी आ. ओमप्रकाश पोकर्णा, आ. अमरनाथ राजूरकर, उद्योजक ए. बी. बंगाली यांनीही उद्योगवाढीस गती देण्यासाठी प्रोत्साहन दिले. प्रारंभी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी कोनशीलेचे अनावरण करुन अग्निशमन संकुलाचे उद्धाटन केले व दीपप्रज्वलन केले. कार्यक्रमास उद्योजक,नांदेड वाघाळा शहर मनपाचे नगरसेवक तसेच विरेंद्रसिंघ गाडीवाले, श्रीराम मेंढेकर इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्रादेशिक अधिकारी संतोष पाटील यांनी केले तर संचालन सर्व्हेअर अंकुश शिरसे यांनी केले. एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता एस. ए. दराडे, उपअभियंता के. यू. गव्हाणे इत्यादी अधिकारी उपस्थित होते.