हिमायतनगर| तालुक्यातील मौजे पारवा खु.येथील एका शेतकऱ्याच्या आखाड्यावरील टिन शेडमधील दोन सोयाबीनचे पोते अज्ञात चोरटयांनी चोरून नेले. हि बाब लक्षात येताच शेतमालकाने पाठलाग केला मात्र त्यापैकी एक चोरटा फरार झाला होता. याची माहिती शेतकऱ्याने पोलिसांना देताच विशेष टीमने घटनेला २४ तास उलटण्यापूर्वीच दुसऱ्या चोरट्यास बेडया ठोकल्या आहेत. सध्या दोन्ही चोरटे पोलीस ठाण्यात गजाआड असून, त्यांना दुपारी न्यायालयात हजार केले जाणार आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, हिमायतनगर शहरासह तालुक्यात सध्या सोयाबीन चोरट्यांऐ धुमाकूळ घातला आहे. मागील आठ दिवसापूर्वी हिमायतनगर शहरातील सदाशिव मार्केटमध्ये सोयाबीन चोरीला गेले होते. त्या घटनेतील दोघांना पोलिसांनी सहा दिवसापूर्वी अटक केली होती. त्या घटनेतील इतर चोरट्यांच्या शोधात पोलीस असताना. दि.३० रोजी हिमायतनगर तालुक्यातील मौजे पारवा येथील शेतकरी गजानन देवराव चव्हाण यांच्या शेतीतील टिनशेडमधे सोयाबीनचे ८० पोते होते. दि.३० रोजी शेतकरी शेतामध्ये काम करीत असतांना ११ वाजेच्या दोन अज्ञात व्यक्तीनि एका मोटार सायकलवर सोयाबीनचे दोन पोते ७५ किलो वजनाचे अंदाजे ९ हजार रुपयाचा माल चोरून नेले. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले, दरम्यान सर्वत्र विचारपूस करताना मोटार सायकल वरील दोन अनोळखी व्यक्तीना सिंगारवाडी रोडवर तामसाकडे जातांना थांबऊन विचारपूस केली.
यावेळी दुचाकीवरील पाठीमागे बसलेल्या चोरटा पळून गेला, एकाला ताब्यात घेऊन पोलिसांना दिले असताना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी आपले नाव गाव सांगितले. त्यानंतर पोलिसांच्या विशेष पथकांना तामसा आबादी परिसरात जाऊन मोठ्या शिताफीने फरार झालेल्या त्या दुसऱ्या चोरट्यास ताब्यात घेतेले. चोरीच्या घटनेला २४ तास उलटण्यापूर्वी हिमायतनगर पोलिसांनी फरार चोरट्यास जेरबंद केले आहे. अश्याच प्रकार अन्य चोरीच्या घटनेतील चोरट्याने देखील पोलिसांनी अटक करून चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी जनतेतून केली जात आहे.
सत्यनारायण मधुकर तोरसे रा.शेतमजुरवाडी आबादी तामसा व फरार झालेल्या त्या चोरट्याचे नाव शंकर अशोक तंजे रा.कांडली रोड तामसा असे आहे. त्यांनीच सोयाबीन चोरले आणि चोरलेले सोयाबीन सोनारी फाटा येथिल ठाकरे यांचे आडत दुकानावर विक्री केल्याचे सांगीतले. सध्या दोन्ही चोरटे पोलीस ठाण्यात गजाआड असून, त्यांना शुक्रवारी दुपारी न्यायालयात हजार केले जाणार आहे.