महावितरणने १० दिवसात शेतकऱ्यांची वीज जोडली नाहीतर आत्मदहन करणार - सुनील चव्हाण - NNL

एकाधिकारशाही विरोधात 1 डिसेंबर रोजी झालेल्या धरणे आंदोलन केलं वक्तव्य


हिमायतनगर|
महावितरण कंपनीने कोणतीही पूर्वसूचना न देता शेतकऱ्यांच्या शेतीपंपाचे वीजपुरवठा खंडित करण्याचा सपाट लावला आहे. महावितरण विभागातील अधिकाऱ्यांच्या एकाधिकार शाहीमुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात आला असून तात्काळ वीजपुअरवठा तोडलेल्या शेतकऱ्यांचा १० दिवसात वीज पुरवठा सुरळीत करावा अन्यथा महावितरण कार्यालयासमोर आत्मदहन करू असा इशारा गोरसेनेचे तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण यांनी धरणे आंदोलन दरम्यान पत्रकारांशी बोलतांना दिला आहे.  

 
हिमायतनगर तालुक्यातील शेतकरी खरिपाच्या मध्यानंतर झालेल्या अतिवृष्टीने पुरता नागवला गेला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे खरिपात पेरणीपासून केलेला खर्चही निघाला नाही. त्यामुळे बळीराजा हवालदिल झालेला आहे. ते झालेलं नुकसान भरून काढण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांनी रब्बीच्या मोसमात गहू, हातभार, करडई, सूर्यफूल, ज्वारी आदींसह इतर पिकांची पेरणी केली. यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत असताना अचानकपणे महावितरण विभागाने कोणतीही पूर्वसूचना न देता कोवळी पिके वाऱ्यावर डोलत असताना वीज पुरवठा खंडित करून सक्तीने वीज बिल वसुलीचा सपाट लावला आहे. यामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आला असून, शेतातील पिके पाणी देता येत नसल्याने वाळू लागली आहेत.


महावितरण कंपनीने एकाधिकार शाही गाजवत वीज पुरवठा खंडित करण्याचे सत्र सुरु केले हा प्रकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे. यामुळे शेतकरी अगोदर निसर्गाच्या कचाट्यात आणि आता महावितरण विभागाच्या तानाशाहीत अडकल्याचे दिसते आहे. हा प्रकार थांबवावा आणि देयके वसुलीला स्थगिती देण्यात येऊन शेतकऱ्यांचे दोन टप्प्यांमध्ये वीज बिल वसुली करण्यात यावे. दिवसा १२ तास ३ फेज वीजपुरवठा देण्यात यावा. आणि महावितरण अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सहकार्य करावे अश्या मागण्या घेऊन हिमायतनगर महावितरण कार्यालया समोर दि.०१ डिसेंबर रोजी गोर सेनेच्या पुढ़ाकारातून धरणे आंदोलन करण्यात आले आहे. आंदोलनाची सुरुवात शाहिरी अंदाजात शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणारे गीत वानखेडे आणि गुंडेकर यांनी सादर करून शासन व अधिकाऱ्यांना कुंभकर्णी झोपेतून जागविण्याचा प्रयत्न केला.

शेतकऱ्यांप्रती शासन व महावितरणचे अधिकारी असे वागत असतील तर शेतकऱ्यांनी रुमणे हातात घ्यावे. तालुक्याचे नेतृत्व करणारे आजी - माजी नेते केवळ स्वतःच्या प्रसिद्धी पुरते कामे करत असून, त्यांना शेतकऱ्यांचा काहीही देणंघेणं नाही असा आरोप आंदोलनात मार्गदर्शन करताना बाबुराव बड्डेवार, प्रकाश जाधव, बालाजी राठोड, सुनील चव्हाण, लखन जाधव, आदींसह अनेक वक्त्यानी केला. त्यानंतर विविध मागण्याचे निवेदन महावितरणचे उपकार्यकारी अभियंता नागेश लोणे यांच्यामार्फत शासनाला नागेश पाटील आष्टीकर, गोरसेना तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण, मजदूर पक्षाचे मराठवाडा अध्यक्ष शुद्धोधन हनवते, डायसाळो दळ तालुकाप्रमुख प्रकाश जाधव, अतुल राठोड, शेख जैनू भाई, बाबुराव बोडावार व मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते. महावितरणचे उपकार्यकारी अभियंता नागेश लोणे याना देण्यात आले.

दरम्यान आंदोलनास माजी आ. नागेश पाटील आष्टीकर यांनी भेट देऊन भोकरचे कार्यकारी अभियंता गोपुलवाड यांचेशी दूरधवनीवरून संपर्क साधून शेतकऱ्यांना वेठीस धरू नका, बिल भरण्यासारखी शेतकऱ्यांची परिस्थिती नाहीये, यंदा अतिवृष्टीने शेतकऱ्यांना बाधित केले आहे. हिमायतनगर तालुक्याचा बहुतांश भाग पैनगंगा नदी नाल्याच्या काठावर असल्याने शेतकरी हवालदिल आहे. हि बाब लक्षात घेता शेतकऱ्यांना सवलत देऊन सहकार्य करावे आणि वीज खंडित करण्याचे थांबवावे असे सूचित केले. यासाठी मी नांदेडच्या मुख्य अभियंत्यांना बोलणार असल्याचे त्यांनी यावेळी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलतांना सांगितले. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी