नांदेड| राज्यात सर्व प्रकारच्या आस्थापना सुरू करण्यात आले आहेत शिवाय सर्वच मंदिरांमध्ये आणि अन्य ठिकाणी धार्मिक उत्सव पार पडत आहेत.बाजारात प्रचंड गर्दी होते आहे. त्यामुळे लाखो भाविकांच्या श्रध्देचा विषय असासानारी माळेगावची यात्रा झालीच पाहिजे अशी आक्रमक भूमिका जिल्हा परिषद सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर यांनी घेतली आहे. जिल्हा परिषदेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत त्यांनी या प्रश्नावरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले होते.
गेल्या दोन वर्षापासून कोरणा महामारीमुळे लावण्यात आल्याने लॉक डाऊन मुळे धार्मिक कार्यक्रम आणि अन्य आस्थापना बंद होत्या. हळूहळू कोरोणाचे सावट सावरत गेल्याने लॉक डाऊन उठवण्यात आला आणि सर्व आस्थापना पूर्ववत सुरू झाले आहेत. अशा परिस्थितीत अनेक धार्मिक स्थळे दर्शनासाठी खुले करण्यात आले आहेत.
मंगल कार्यालय, चित्रपटगृह, हॉटेल्स असे सर्व प्रकारचे व्यावसायिक उद्योगधंदे सुरू करण्यात आले. राज्यात विविध निवडणुका घेतल्या जात आहेत. प्रचंड जाहीर सभा घेतल्या जात आहेत. विविध मोर्चे काढले जात आहेत. तिथेही प्रचंड गर्दी होत आहे. यासगळ्या बाबींना सूट आणि यात्रेलाच बंदी का असा सवाल चिखलीकर यांनी उपस्थित केला. माळेगावच्या यात्रेवर बंदी म्हणजे लाखो भाविकांच्या भावनेचा खून आहे आणि ही बाब प्रशासनाला महागात पडेल असा इशाराही त्यांनी दिला.
लाखो भाविकांची श्रद्धा असणारी माळेगावची यात्रा तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने तात्काळ माळेगावची यात्रा घेण्याचा निर्णय घ्यावा आणि तारखा जाहीर कराव्यात .खंडोबा भक्तांना नव्या वर्षाच्या तोंडावरती मोठी भेट द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माळेगाव यात्रेसाठी देशभरातून भाविक भक्त आणि व्यापारी येत असतात. या यात्रेत अश्व, उंट आणि गढवांची खरेदी-विक्री होत असते. त्यामुळे यात्रा अत्यंत महत्वपूर्ण अशी आहे. त्यामुळे यावर्षी माळेगावची यात्रा भरली पाहिजे अशी आग्रही भूमिका आहे.