हिमायतनगर, अनिल नाईक| शहरासह तालुक्यातीळ कामारवाडी, पोटा बु, कामारी, खडकी बा., सह अनेक गावात अवैद्य देशी दारूची विक्री आणि शहरातील चौपाटी, बाजार चौक, बस स्थानक परिसरात चालू असलेल्या अवैद्य कल्याण, मुंबई, दे मिलन- नाईट मटका तात्काळ बंद करण्यात यावी. आणि या धंद्यांना अभय देणाऱ्या दोषी पोलिसांची चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी. अन्यथा दि. २९ नोव्हेंबर २०२१ पासून मराठा साम्राज्य संघटना हिमायतनगर तहसीपुढे आमरण उपोषण करेल असा इशारा एका निवेदनाद्वारे मुन्ना शिंदे, तालुका अध्यक्ष यांनी दिला आहे.
मागील वर्षीच्या कोरोना काळामुळे सर्वसामान्य नागरिक, गोरगरीब आर्थिक संकटात आला आहे, आता कुठे सर्व सुरळीत होत असताना हिमायतनगर शहरासह तालुक्यात अवैध देशी दारू, मटका, जुगार यासह अनेक अवैद्य धंदे राजरोसपणे चालविले जात आहेत. हा प्रकार पोलीस प्रशासनाला माहित असताना देखील स्वार्थपोटी ते याकडे डोळेझाक करत आहेत. परिणामी अनेक नागरिक या अवैध्य धंद्याकडे वळत असून, युवा पिढी सुद्धा व्यसनाधीन होत चालली आहे. त्यामुळे गोरगरीबांचे संसार उध्वस्त होत आहेत. या विषयी जिल्हाधिकारी नांदेड, पोलीस अधीक्षक नांदेड, पोलीस उपअधीक्षक भोकर व तहसीलदार हिमायतनगर, पोलीस निरीक्षक हिमायतनगर यांच्याकडे मराठा साम्राज्य संघटनेने तक्रार करून वारंवार निवेदने देऊनही हे सर्व धंदे बंद करण्यात यावे अशी मागणी केली.
मात्र प्रशासनाने या विषयाकडे साफ दुर्लक्ष करण्याचे काम केले आहे. परिणामी मोठ्या प्रमाणात अवैध देशी दारू, मटका, जुगार हे सर्व धंदे खुलेआम सुरू आहेत. यामुळे शहरातील युवक व्यसनाधीन होत चालला असून, मोठ्या प्रमाणात मटका जुगार या अवैध धंद्याच्या मार्गाला अनेक व्यक्ती लागत आहेत. तात्काळ हे अवैद्य धंदे बंद झाले पाहिजे नाहीतर आगामी काळात म्हणजे येत्या दिनांक २९ नोव्हेंबर २०२१ वार सोमवार पासून हिमायतनगर तहसील कार्यालयापुढे बेमुदत आमरण उपोषणास बसणार आहे. असा इशारा मराठा साम्राज्य संघटनेचे तालुकाध्यक्ष माधव शिंदे यांनी दिला आहे.
सदरील उपोषणाच्या माध्यमातून प्रशासनाला फक्त तेवढीच मागणी राहील की हिमायतनगर शहरातील व तालुक्यातील सुरु असलेली अवैध देशी दारू विक्री, खुलेआम सुरू असलेल्या मटका, जुगार, यावर प्रशासनाने कार्यवाही करावी व सर्व अवैध धंद्यावर प्रतिबंध लावावा. असेही मुन्ना शिंदे, तालुका अध्यक्ष, मराठा साम्राज्य संघ हिमायतनगर, जिल्हा नांदेड यांनी पत्रकारांशी बोलताना म्हंटले आहे.