नांदेड| भारतीय राज्यघटना हाच देशाचा राष्ट्रीयग्रंथ आहे, असे प्रतिपादन शिक्षण व लोेकविज्ञान चळवळीतील कार्यकर्ते, राज्य पुरस्कार प्राप्त डॉ. हेमंत कार्ले यांनी केले. जिल्हा परिषद हायस्कूल वाघी येथील ‘संविधान पायरी’ या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते.
संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपक्रमाची प्रस्तावना प्रकल्प प्रमुख संजय शेळगे यांनी केली. डॉ. कार्ले पुढे म्हणाले की, ‘संविधान पायरी’ या उपक्रमातून शालेय विद्यार्थ्यांना भारतीय राज्यघटनेची ओळख होणार असून संविधानातील कायदे, हक्क, लोकशाही, भारत देश या विषयाबरोबरच हक्क, अधिकार व कर्तव्याची जाणीव होणार आहे. त्यामुळे करिअर व व्यक्तीमत्त्व विकासाबरोबरच देशासाठी सुजाण व जागरुक नागरिक निर्माण होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी शाळेतील विद्यार्थी, शिक्षकांनी राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. प्रशालेचे मुख्याध्यापक सुरेश बादशहा यांच्या अध्यक्षीय समारोपाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमात रावसाहेब देवकरे, सुदर्शन बिंगेवार, राजाराम कर्हाळे, श्रीधर जोशी, राजकुमार गोटे, विठ्ठल पवार, विलास झोळगे, बालाजी क्षीरसागर, बालाजी गीते, रामदास अलकटवार, अनंता बैस, ऋषिकेश ढाके आदींसह शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.