मराठवाड्यातील अतिवृष्टी व गुलाबी चक्रवादळाने हतबल झालेल्या बळीराजाला आढेवेढे न घेता तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारच्या निकषांप्रमाणे तातडीने आर्थिक मदत करा -NNL

मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे यांच्याकडे शेतकरी पुत्रांची आग्रही मागणी !


नांदेड|
राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी अभूतपूर्व अशा अतिवृष्टी व पूर परिस्थितिमुळे हतबल झालेल्या बळीराजाला तातडीने आर्थिक मदत देऊन सहकार्य करत काही प्रमाणात तरी दिलासा देणे ही आपली प्राथमिक जबाबदारी असायला हवी. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होऊन २ आठवडे झाले तरी राज्य सरकारने ठोस मदतीचा हात अजूनही पुढे केलेला नाही. हे अत्यंत असंवेदनशील व बेजबाबदार पणाचे वाटते. देशातील विविध भागांत होत असलेल्या गंभीर घटनांची नोंद घेत अनुषंगिक प्रतिक्रिया देणे, गरजेनुसार कृती करणे याला विरोध असायचे काहीच कारण नाही. परंतु महाराष्ट्रातील नागरिकांना अडचणीच्या काळात तत्परतेने मदत करणे यात राज्य सरकारने वारंवार कमी पडून कसे चालणार आहे? अशी भावना शेतकरी पुत्र म्हणून भागवत देवसरकर, प्रदेशाध्यक्ष, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद महाराष्ट्र यांनी व्यक्त केली आहे. 

आज दि.१३.१०.२०२१ रोजी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तरी या संदर्भात योग्य निर्णय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे,व मंत्रिमंडळ घेतील ही अपेक्षा आहे.राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे असे वारंवार बोलले जाते. परंतु राज्य सरकारचे दैनंदिन शासन निर्णय बघितले तर हे स्पष्टपणे लक्षात येत आहे की, खर्चाच्या प्राथमिक बाबींच्या पलीकडे जाऊन अनेक कामांसाठी राज्य सरकार मोठ्या प्रमाणात निधी खर्च करत आहे. मग जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या बाबतीतच राज्य शासन पैसे नसल्याच्या बाबी पुढे करून अन्याय का करत आहे ?

अतिवृष्टी व पूर परिस्थितीमध्ये पिकांबरोबरच जमिनीच्या व मालमत्तेच्या झालेल्या नुकसानीची व्याप्ती लक्षात घेत NDRF /SDRF च्या निकषाच्या पलीकडे जाऊन बाधित नागरिकांना मदत करणे अपेक्षित आहे.तत्कालीन मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारने पश्चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरबाधित शेतकऱ्यांनी घेतलेले सर्व पिकांसाठीचे २०१८-१९ आणि २०१९-२० या दोन वर्षांसाठीचे १ हेक्टर पर्यंतचे पीक कर्ज माफ केले होते. तसेच नुकसान भरपाई म्हणून स्थायी आदेशाच्या पलीकडे जाऊन तिपटीने नगदी स्वरूपात मदत केली होती. त्यामुळे यापेक्षा काही कमी देणे हे मराठवाड्यातील नागरिकांसाठी अन्यायकारक राहील. बाधित शेतकऱ्यांना पीक कर्जमाफी व जमीन खरवडून गेलेल्या शेतकऱ्यांना (बहुभूधारकांसह) पर्याप्त अनुदान देणे गरजेचे राहणार आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने पश्चिम महाराष्ट्राला जी 2019 साली मदत केली होति, त्याच धर्तीवर विद्यमान मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या सरकारने मराठवाड्याला मदत करून दिलासा देण्याचे काम करावे,हेेक्‍टरी 6800 रुपये ही रक्कम अपुरी असून किमान कमीत कमी हेक्टरी 25000 रुपये शेतकऱ्यांना मदत देणे हे अतिशय गरजेचे आहे, यासाठी मराठवाड्यातील लोकप्र तिनिधींनी राज्य सरकारवर दवाब आणला पाहिजे. तरच राज्य सरकार बळीराजाला मदत करेल, ही मदत मिळाली तरच या दलदलीतून शेतकरी बाहेर पडेल. अन्यथा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरणार नाही. मायबाप सरकारने या गोष्टीचा विचार करून अतिवृष्टीने ग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्याची गरज आहे, या महाविकास आघाडी सरकारकडून एक शेतकरी पुत्र म्हणून भागवत देवसरकर, प्रदेशाध्यक्ष, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद महाराष्ट्र यांनी माफक अपेक्षा व्यक्त केली आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी