पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मिळणार उचारासाठी निधी
नांदेड| जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणाऱ्या खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पुढाकारातून अनेकांचे प्राण वाचविण्यासाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून लाखो रुपयांची मदत करण्यात आली आहे. याच अनुषंगाने मुदखेड तालुक्यातील नागेली येथील साडेचार वर्षाच्या बालकाच्या कॅन्सरवरील उपचारांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून तीन लाख रुपयांचा तीन लाख रुपयांची मदत मिळवून दिली आहे. सदर बालकावर औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील नागेली येथील गणेश शिंदे यांचा मुलगा धनराज शिंदे याला पोटाचा कॅन्सर असल्याचे निदान काही महिन्यापूर्वी झाले आहे. धनराज केवळ साडेचार वर्षाचा आहे. त्यामुळे आपल्या मुलाला वाचविण्यासाठी धनराजचे वडील गणेश शिंदे यांचा आटापिटा सुरू आहे. कॅन्सर इलाजासाठी मोठी रक्कम लागणार असल्याने गणेश शिंदे पैशाची जुळवाजुळव करण्यात हैराण होते. याच परिस्थितीत त्यांनी माझ्या मुलाच्या उपचारासाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मदत मिळवून द्यावी या अनुषंगाने खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांची भेट घेतली होती.
त्यानंतर खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी ही मदत मिळवून देण्यासाठी प्रत्यक्ष पुढाकार घेतला त्यामुळे दिनांक 30 जुलै 2021 रोजी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी साठी पाठविण्यात आलेल्या पत्राची संबंधित विभागाने गांभीर्याने दखल घेऊन धनराज च्या उपचारासाठी 3 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे औरंगाबाद येथील कमलनयन बजाज रुग्णालयात धनराज याच्या कॅन्सरवर उपचार करण्यात येणार आहेत.
यावेळी खा.प्रतापराव पाटील चिखलीकर व डॉ.संतुकराव हंबर्डे यांच्या हस्ते शिंदे यांना निधी मंजूर झाल्याचे पत्र देण्यात आले. याप्रसंगी महानगराध्यक्ष प्रवीण साले, प्रदेश कार्यकारणी सदस्य चैतन्य बापू देशमुख, बाळू खोमणे, राजेश देशमुख कुंटूरकर, डॉ.सचिन उमरेकर, बालाजी शिंदे कासारखेडकर, विजय गंभीरे आदींची उपस्थिती होती. खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केलेल्या या मदतीमुळे माझ्या मुलाचे प्राण वाचवण्यासाठी निश्चितपणे मदत होईल, असा विश्वास धनराजचे वडील गणेश शिंदे यांनी व्यक्त केला.