नांदेड| महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी नांदेडच्या वजिराबाद येथील खादी भांडार गृहाला भेट दिली. यावेळी खादी भांडारचे महाव्यवस्थापक अरुण किनगावकर, व्यवस्थापक विश्वनाथ नांदेडकर आदींची उपस्थिती होती. यावेळी मराठावाडा खादी ग्रामोद्योग समितीच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचा सूताचा हार व गाडीला लावण्यात येणारा तिरंगी ध्वज देवून सत्कार करण्यात आला. प्रारंभी मुख्य कार्यकारी अधिकारी ठाकूर यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.
गेल्या पंचवीस वर्षापासून महात्मा गांधींजीच्या जयंती दिनी खादी कपडे खरेदी करण्याची परंपरा मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी जोपासली आहे. आज त्यांनी नांदेडच्या वजिराबाद येथील खादी भांडारातून खादीचे कपडे खरेदी केले. मराठवाड्यातल्या खादी ग्राम उद्योग चळवळीमध्ये त्यांचा अनेक वर्षापासूनचा सहभाग आहे. खादी ग्रामोद्योगमध्ये असणाऱ्या अडचणी संदर्भात किनगावकर यांच्याशी चर्चा करुन स्वतंत्र बैठक घेणार असल्याचे सांगीतले. भविष्यकाळात शालेय विद्यार्थ्यांना देखील खादी कपडयातील गणवेश असण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषदे अंतर्गत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दर शुक्रवारी खादीचे कपडे परिधान करावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. खादी भांडार गृहाला भेट देऊन त्यांनी समाधान व्यक्त केले.
महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त खादी भांडारातून 20 टक्के सूट देण्यात आलेली आहे. मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीच्यावतीने वजीराबाद येथे असलेल्या खादी भांडार गृहात खादींच्या कपडयांची विक्री सुरू आहे. सूती खादी मध्ये- खादी शर्टींग, कोटींग, सतरंजी, आसनपट्टी, बेडशीट, चादर, टॉवेल, लुंगी, धोती, रेडीमेड शर्टस, पायजमा, बनियन, अंडरवेअर विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. रेशीम मध्ये- कोसा शर्टींग, टस्सर शर्टींग, रेशीम साडी, पॉलीवस्त्र- शर्टींग, कोटींग, रेडीमेड शर्ट, हाफ शर्ट, पॅंट. उलन मध्ये उलन निळी कोटींग, ब्लँकेट, रग, घोंगडी तसेच ग्राम उद्योगाचे मध, मंजन, उदबत्ती, आयुर्वेदिक साबण, ऑक्साईड मूर्ती, गिफ्ट आर्टिकल्स आदी वस्तू खादी भांडारामध्ये उपलब्ध आहेत.