नांदेड| उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी समूह भावनेने काम करून आपल्यातील क्षमता सिद्ध केली आहे. यापुढेही स्वतःला समाधान होईल असे काम आपण करूया, असे प्रतिपादन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी काल केले. मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर वर्षा ठाकूर-घुगे यांच्या कार्यकाळास 28 सप्टेंबर 2021 रोजी एक वर्ष पूर्ण झाले, त्या औचित्याने सर्व विभाग प्रमुख व गट स्तरावरील अधिकाऱ्यांना संबोधित करताना त्या बोलत होत्या.
यावेळी त्यांच्या वर्ष कार्यपूर्तीवर डॉ. विलास ढवळे, मिलिंद व्यवहारे व डॉ. नंदलाल लोकडे यांनी संपादित केलेल्या संवाद वर्षपूर्ती विशेषांकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषदे अंतर्गत राबविण्यात आलेले कार्यक्रम नाविन्यपूर्ण उपक्रम ठळक बाबींचा लेखाजोखा या पुस्तकात मांडण्यात आला आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष तुबाकले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, व्ही. आर पाटील, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
जिल्हाभर पाऊस होत आहे. गावोगाव अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. पडझड, नुकसानी आदी बाबींची पाहणी क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत करावी. सर्वांनी सतर्क राहावे. गट स्तरावरील अधिकाऱ्यांनी वेळोवेळी याबाबतची माहिती जिल्हा कार्यालयास कळविण्याबाबतही त्यांनी सूचना दिल्या आहेत. यावेळी सर्व खाते प्रमुखांची उपस्थिती होती.