नविन नांदेड| महाराष्ट्र राज्य तलाठी संघ तालुका शाखा नांदेड च्या वतीने रामदास जगताप राज्य समन्वयक जमाबंदी आयुक्त कार्यालय पुणे यांच्या अर्वाच्य भाषेबाबत मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व अप्पर मुख्य सचिव नितीन करीर ,जमाबंदी आयुक्त सुधांशु यांच्याकडे निवेदनाद्वारे तात्काळ बदली करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दिलेल्या निवेदनात राज्यातील तलाठी, पटवारी, मंडळाधिकारी हे महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतीमान व पारदर्शक करणे, तसेच महसूली उत्पन्नात वाढ करून राज्याचा विकासाचा मार्ग प्रशस्त करणे व शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम करत असतांना महसूली लेखे जोखे संगणकीकृत करणे, ७/१२ व ई फेरफार, ई चावडी या विविध योजना तलाठी, पटवारी व मंडळाधिकारी यांनी स्वखर्चाने व रात्रंदिवस काम करून, महत्वकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास नेलेला आहे.
तथापि, महाराष्ट्र राज्य तलाठी, पटवारी, मंडलाधिकारी समन्वय महासंघाचे अध्यक्ष श्री. ज्ञानदेव डुबल (आप्पा) यांनी सध्या राज्यातील नैसर्गीक आपत्ती, ई-पिक पाहणी आणि मोफत ७/१२ व ८ अ खातेदारांना वितरण यासंदर्भात मंगळवार दिनांक ०५.१०.२०२१ रोजी तलाठी, पटवारी, मंडळाधिकारी यांना मार्गदर्शनपर राज्य कार्यकारणी या व्हाटसअप ग्रुपवर मेसेज पाठवला होता. तो अन्य गुपव्दारे जगताप यांना मिळाला. त्यावर त्यांनी वॉटसॉप ग्रुपवरच "मुर्खासारखे मेसेज पाठवू नका" असे लिहून श्री. डुबल (आप्पा) यांना मुर्ख ठरविले आहे. पर्यायाने राज्यातील सर्व तलाठी, मंडळाधिकारी, तलाठी संवर्गातील अव्वल कारकुन व नायब तहसिलदार यांचा अपमान केलेला आहे. त्यामुळे तीव्र स्वरूपाच्या भावना असून जगताप राज्य समन्वयक यांची तात्काळ बदली करावी.शासनाने तलाठी व मंडळाधिकारी यांच्या भावनांचा गांभिर्याने विचार करुन जगताप यांची अन्यत्र बदली करावी. अन्यथा महाराष्ट्र राज्य तलाठी संघ नाईलाजास्तव आंदोलन सुरु करणार आहे.
रामदास जगताप यांची अन्यत्र बदली न झाल्यास दि. १३ ऑक्टोबर २०२१ पासून सर्व कामावर बहिष्कार टाकतील, आंदोलन कालावधीमध्ये नैसर्गीक आपत्ती व निवडणूक आयोगाचे काम आदेशाप्रमाणे करतील, तरी गांभिर्याने विचार करून, विनाविलंब जगताप यांची तात्काळ अन्यत्र बदली करावी. अन्यथा उपरोक्त नमुद केलेले आंदोलन राज्य संघ सुरु करेल व होणा-या परिणामाची जबाबदारी शासनावर राहील असा इशारा अध्यक्ष पी.डबलु.पाटील, कार्याध्यक्ष अनिरुद्ध जोंधळे, उपाध्यक्ष एस.डी. देवापुरकर,सचिव आय.बी.मंडगिलवार, कोषाध्यक्ष ज्योती निवडंगे, सहसचिव मनोज देवणे यांच्या सह पदाधिकारी यांनी दिला आहे.