देवीची ओटी कशी भरावी ? -NNL


खण-नारळाने देवीची ओटी भरणे, हा देवीच्या दर्शनाच्या वेळी करावयाचा एक प्रमुख उपचार आहे. हा उपचार शास्त्र समजून अन् भावपूर्ण केला, तर त्याचा आध्यात्मिक लाभ अधिक प्रमाणात भाविकाला होतो. पुढील ज्ञान (माहिती) वाचून देवीची ओटी योग्यरित्या भरून पूजकांनी देवीची कृपा संपादन करावी!

१. देवीची ओटी भरण्याचे महत्त्व काय ?

‘देवीपूजनाची सांगता देवीची ओटी भरून (खण आणि साडी अर्पण करून) करणे, म्हणजे देवीच्या निर्गुण तत्त्वाला आपल्या आध्यात्मिक उन्नतीचे वा कल्याणाचे कार्य करण्यासाठी सगुणात येण्यास आवाहन करणे होय. देवीला खण आणि साडी अर्पण करतांना देवीला प्रत्यक्ष कार्य करण्याची प्रार्थना केल्याने त्या आधी केलेल्या पंचोपचार विधीतून कार्यरत झालेल्या देवीच्या निर्गुण तत्त्वाला साडी आणि खण यांच्या रूपाने मूर्त सगुण रूपात साकार होण्यास साहाय्य होते.' 

२. देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत

अ. ‘देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी; कारण देवतेकडून येणार्‍या सात्त्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत या धाग्यांमध्ये अधिक असते.

आ. एका ताटात साडी ठेवून तिच्यावर खण, नारळ आणि थोडे तांदूळ ठेवावेत. नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी. नंतर ताटातील या सर्व वस्तू हाताच्या ओंजळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छातीसमोर येतील, अशा पद्धतीने देवीसमोर उभे रहावे.

इ. ‘देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी’, अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी. यामुळे देवीतत्त्व जागृत होण्यास साहाय्य होते.

ई. ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ वहावेत.

उ. देवीला अर्पण केलेली साडी शक्य असल्यास परिधान करावी, तसेच नारळातील खोबरे प्रसाद म्हणून ग्रहण करावे. 

४. देवीची ओटी भरतांना  होणारी  सूक्ष्मातील  प्रक्रिया आणि त्यामुळे होणारे लाभ

अ. नारळाच्या शेंडीकडे देवीचे तत्त्व आकृष्ट होते. हे तत्त्व नारळाद्वारे खण आणि साडी यांमध्ये संक्रमित होण्यास साहाय्य होते. तसेच नारळाच्या शेंडीतून प्रक्षेपित होणार्‍या लहरींमुळे जिवाच्या शरिराभोवती संरक्षक-कवच निर्माण होते.

आ. वस्त्रातून पृथ्वीतत्त्वाच्या साहाय्याने सात्त्विक लहरी प्रक्षेपित होतात. या लहरी नारळातील पाण्यात असलेल्या आपतत्त्वाच्या साहाय्याने प्रक्षेपित होणार्‍या लहरींमुळे गतीमान होऊन कार्यरत होतात. त्यामुळे पूजा करणार्‍याच्या देहाभोवती त्या लहरींचे संरक्षक-कवच निर्माण होण्यास साहाय्य होते. तसेच साडी आणि खण यांमध्ये आलेल्या देवीतत्त्वाच्या सात्त्विक लहरींमुळे आपला प्राणदेह आणि प्राणमयकोश यांची शुद्धी होण्यास साहाय्य होते.

इ. हाताची ओंजळ छातीसमोर येईल, अशा पद्धतीने उभे राहिल्याने होणार्‍या मुद्रेमुळे शरिरातील चंद्रनाडी कार्यरत होण्यास साहाय्य होते, तसेच मनोमयकोशातील सत्त्वकणांचे प्रमाण वाढण्यास साहाय्य झाल्याने मन शांत होते. या मुद्रेमुळे पूजक देवतेसमोर जास्तीतजास्त नम्र होतो. देवतेकडून येणार्‍या सात्त्विक लहरी हाताच्या बोटांतून पूजा करणार्‍याच्या शरिरात संक्रमित होण्यास साहाय्य झाल्याने शरिरातील अनाहतचक्र कार्यरत होऊन पूजा करणार्‍याचा देवीप्रती भाव जागृत होतो. यामुळे त्याच्या स्थूल आणि सूक्ष्म या देहांची शुद्धी होण्यास साहाय्य होते. जेवढा देवीप्रती भाव जास्त, तेवढी पूजाविधीतून मिळालेली सात्त्विकता जास्त काळ टिकते.

ई. तांदूळ हे सर्वसमावेशक असल्याने चैतन्याचे ग्रहण आणि प्रक्षेपण करण्यात अग्रेसर असतात. त्यामुळे तांदळाचा समावेश ओटीत प्राधान्याने केला जातो.'

५. विशिष्ट देवीला विशिष्ट रंगाचा खण आणि साडी अर्पण केल्याने काय लाभ होतो ?

‘त्या त्या देवीला तिचे तत्त्व जास्तीतजास्त आणि लवकर आकृष्ट करून घेणार्‍या रंगाचा खण आणि साडी अर्पण केल्याने त्या त्या देवीचे तत्त्व जिवासाठी अल्प कालावधीत कार्यरत होते. ५० टक्क्यांपेक्षा जास्त आध्यात्मिक पातळीच्या किंवा भाव असलेल्या साधकाने विशिष्ट उद्देशासाठी देवीला विशिष्ट रंगाचा खण आणि साडी अर्पण करण्याची तेवढी आवश्यकता नसते; कारण जिवाच्या भावावर किंवा प्रार्थनेवर अल्प-अधिक प्रमाणात देवीच्या तारक किंवा मारक या रूपांनी जिवाकरता कार्य करणे अवलंबून असते. 

६. देवीला  सहावारी  साडीपेक्षा  नऊवारी  साडी अर्पण करणे अधिक योग्य का ठरते ?

देवतेप्रती भाव असणार्‍या आणि गुरुकृपायोगाप्रमाणे समष्टी साधना करणार्‍या पूजकाने त्याच्या भावानुसार देवीला कोणत्याही प्रकारची साडी अर्पण केली, तरी चालू शकते; कारण त्याच्या भावामुळे अपेक्षित फळाचा लाभ त्याला होतोच. मात्र प्राथमिक टप्प्याच्या साधकाची किंवा कर्मकांडाप्रमाणे साधना करणार्‍यांची प्रत्येक गोष्ट नियमानुसार होणे महत्त्वाचे असल्याने त्यांनी देवीला सहावारी साडीपेक्षा नऊवारी साडी अर्पण करणे योग्य आहे. नऊवारी साडी अर्पण करणे, हे पूजा करणार्‍याच्या आवश्यकतेप्रमाणे देवीने नऊ रूपांच्या माध्यमातून कार्य करण्याचे प्रतीक आहे. नऊवारी साडीतील नऊ वार (स्तर) हे देवीची कार्य करणारी नऊ रूपे दर्शवतात. नऊवारी साडी अर्पण करणे, म्हणजे मूळ निर्गुण शक्‍तीला, जिच्यात देवीतत्त्वाची, म्हणजेच शक्‍तीची सर्व रूपे सामावलेली आहेत, त्या श्री दुर्गादेवीला तिच्या नऊ अंगांसह (नऊ रूपांसह) प्रगट होऊन कार्य करण्याचे आवाहन करणे होय. ‘९’ हा आकडा श्री दुर्गादेवीच्या कार्य करणार्‍या प्रमुख नऊ रूपांचे प्रतिनिधीत्व करतो.’ 

७. देवीला अर्पण केल्या जाणार्‍या खणाचा आकार त्रिकोणी का असतो ?

‘त्रिकोणी आकार हा ब्रह्मा-विष्णु-महेश यांपैकी ब्रह्माच्या इच्छाशक्‍तीशी निगडित आहे. ब्रह्मांडातील इच्छालहरींचे भ्रमणही उजवीकडून डावीकडे त्रिकोणी आकारात संक्रमित होत असते. देवीला त्रिकोणी आकारातील खण अर्पण करणे, म्हणजे ‘आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी’, यासाठी आदिशक्‍ती श्री दुर्गादेवीची इच्छाशक्‍ती प्रबळ करून तिची कृपादृष्टी संपादन करणे होय.’

या विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सनातन निर्मित सनातन-निर्मित लघुग्रंथ ‘देवीपूजनाशी संबंधित कृतींचे शास्त्र’ हा ग्रंथ अवश्य वाचा ! ऑनलाईन ग्रंथ खरेदी करण्यासाठी https://sanatanshop.comया संकेत स्थळाला भेट द्या. अथवा संपर्क करू शकता.

संदर्भ : सनातन-निर्मित लघुग्रंथ ‘देवीपूजनाशी  संबंधित कृतींचे शास्त्र’

संकलन- श्री. दत्तात्रेय वाघूळदे, सनातन संस्था संपर्क- 9284027180


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी