हिमायतनगर,अनिल नाईक | सोयाबीन काढतांना मळणी यंत्रात (हेडिंबात) अडकून एका तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील सवना ज. शिवारात दि. ४ सोमवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे सवना गावावर शोककळा पसरली असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मोहन अंबादास अनगुलवार वय ३५ वर्ष रा. सवना ज. असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
मोहन अनगुलवार हे तरूण मेहनती शेतकरी होते, दि. ४ सोमवारी शेतातील सोयाबीन मळणी यंत्रातून काढण्याचे काम करत असतांना, अचानक सुरु असलेल्या मळणी यंत्रात ते अडकले. हा प्रकार हजर असलेल्या शेतकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ ट्रॅक्टर बंद करून काढण्याचा प्रयत्न केला. परंतु यातच त्यांचा मृत्यू झाला होता.
काही वेळाने मळणी यंत्रातुन (हेडंबा) खोलुन मोहन अनगुलवार यांचे प्रेत बाहेर काढण्यात येवुन शव विच्छेदनासाठी हिमायतनगर ग्रामिण रूग्णालयात नेण्यात आले. येथे उत्तरीय तपासणी करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची प्रक्रीया वृत्तलिहीपर्यंत सुरू होती. मयत शेतकऱ्याच्या पश्चात आई वडील भाऊ, मुलगा, मुलगी असा मोठा परीवार आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळासह ग्रामिण रूग्णालयात चाहत्यांनी एकच गर्दी केली होती.
अगोदरच दुबार पेरणी, एैन काढणीला आलेल्या सोयाबीन कापसाला अतिवृष्टीचा फटका यामुळे शेतकरी चिंताग्रस्त असतांना हि घडलेली घटना दुर्दैवी ह्रदय हेलावनारी आहे. शासनाने पिडीत कुटूंबाला भरघोस आर्थीक मदत करावी अशी मागणी शेतकरी व मयताच्या नातेनाईका कडुन केली जात आहे.