नांदेड| बदलत्या जीवन शैलीचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून आहारात फास्ट फुड, पिझा, बर्गर इत्यादींचे वाढते सेवन व सोसल मिडीयाच्या मोबाईल, व्हॉटसअपच्या अतिवापरामुळे, वाढत्या ताणतणावामध्ये आजची युवा पिढी अडकलेली आहे. यामुळेच भारत हा मधुमेहासारख्या आजारांची राजधानी बनत चालला आहे. या परिस्थितीला बदलण्यासाठी व आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी आजच्या युवा पिढींनी “व्यायाम व योग्य आहार” यास प्राधान्य देणे गरजेचे आहे. असे उदगारही यावेळी पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी काढले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभाग व पीपल्स महाविद्यालय, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ३ ऑक्टोबर, २०२१ रोजी प.पू. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त “बदलती जीवनशैली आणि आरोग्य” या विषयावर ते बोलत होते. भारतात आरोग्याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले जाते. निरोगी आरोग्यासाठी नियमित व्यायाम, पूरक आहार व चांगली झोप घेणे असा बदल जीवनपद्धतीमध्ये केल्यास दीर्घायुष्यी होऊन निरोगी, उत्तम जीवन जगता येईल व मधुमेहासारख्या आजारास आळा बसेल. आज भारतात १२ टक्के लोकांना मधुमेहामुळे अंधत्व येत आहे. या बाबीवरही विचार करणे गरजेचे आहे.
या ऑनलाईन व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले हे होते. अध्यक्षीय समारोप करतांना ते म्हणाले की, बदल हा निसर्गाचा नियम आहे. परंतु बदलत्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार राहणे गरजेचे आहे. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन व माजी खासदार तथा नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश काब्दे यांची या व्याख्यानाला प्रमुख उपस्थिती होती. या ऑनलाईन व्याख्यानामध्ये व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिसभा सदस्य, विद्या परीषद सदस्य, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व नागरिक यांची उपस्थिती होती.
या ऑनलाईन व्याख्यानाच्या यशस्वीतेसाठी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, पीपल्स कॉलेजचे प्राचार्य, डॉ. आर. एम. जाधव, व्यवस्थापन परिषद सदस्या डॉ. वैजयंता पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. ज्ञानोबा मुंढे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. शिवराज बोकडे, उपप्राचार्य, बी. डी. कोम्पलवार, उपप्राचार्य, डॉ. ए. एन. सिद्धेवाड व व्याख्यानमालेचे संयोजक डॉ. डी. एन. मोरे, संभा कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. शिवराज बोकडे यांनी तर पीपल्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. एम. जाधव यांनी आभार मानले. a