शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या हिमायतनगरच्या आडत व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल करा - बसपा तालुकाध्यक्ष मुनेश्वर


हिमायतनगर, अनिल नाईक|
अप्रमाणित मॉईश्चर यंत्रे आणि कच्चा पावतीवर व्यवहार करून शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या हिमायतनगरातील आडत दुकानांची तातडीने तपासणी करून दोषी व्यापाऱ्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करा. अशी मागणी बहुजन समाज पार्टीचे तालुकाध्यक्ष धम्मपाल मुनेश्वर यांनी हिमायतनगरचे तहसीलदार गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहेेे.

सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले अाहे. या अतिवृष्टीच्या तडाख्यातून थोडेफार बचावलेले सोयाबीन शेतकरी बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. येथे मात्र व्यापारी शेतकऱ्यांना अक्षरश: लुबाडत आहेत, असे धम्मपाल मुनेश्वर यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. हिमायतनगरच्या व्यापाऱ्यांकडे असलेली मॉईश्चर तपासणी यंत्रे प्रमाणित नाहीत. व्यापाऱ्यांनी या यंत्रात त्यांच्या सोयीनुसार छेडछाड करून घेतल्यामुळे हे यंत्र सोयाबीनमध्ये व्यापाऱ्यांना हवे तेवढे मॉईश्चर दाखवते. सोयाबीनच्या एकाच मालातील मॉईश्चरची वेगवेगळ्या व्यापाऱ्यांकडे तपासणी केली असता मॉोईश्चरचे प्रमाण वेगवेगळे आढळते. याचाच अर्थ हिमायतनगरच्या व्यापाऱ्यांकडील मॉईश्चर यंत्रात गडबड असून ही शेतकऱ्यांची शुद्ध फसवणूक आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीशी मिलीभगत करून व्यापारी शेतकऱ्यांची राजरोसपणे लूट करत आहेत, ही गंभीर बाब आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.

हिमायतनगरचे आडत व्यापारी शेतकऱ्यांचा शेतीमाल कच्चा नोंदीवरच खरेदी करतात. शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल खरेदी केल्याची कुठलीही अधिकृत पावती देत नाहीत. या कच्चा पावतीवरील  व्यवहारामुळे शासनाचा लक्षावधी रुपयांचा कर हिमायतनगरचे व्यापारी बुडवत आहेत. एका एका आडत व्यापाऱ्याची उलाढाल काही कोटींच्या घरात असूनही अधिकृत पक्की पावतीच फाडली जात नसल्यामुळे या उलाढालीची शासन दरबारी अधिकृत नोंदच होत नसल्याच्या गंभीर बाबीकडेही या निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे.

हिमायतनगरच्या आडत व्यापाऱ्यांचे एकूणच व्यवहार संशयास्पद असून येथील सर्वच आडत दुकानांची तातडीने तपासणी करून दोषी व्यापाऱ्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती कृषी व पणन संचालक तसेच नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आल्या आहेत.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी