हिमायतनगर, अनिल नाईक | नदीकाठावरील शेतकऱ्यांना शासनाने मदत देऊन आर्थिक संकटातून बाहेर काढावे यासाठी माझे प्रयत्न सुरु आहेत. गतवर्षीपासून बळीराजा आर्थिक संकटात आला असताना या पीकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना केवळ लुटण्याचे काम केले आहे. यापुढे पीकविमा कंपन्यां हिंगोली लोकसभा मतदार संघात दाखल झाल्या तर त्यांना इकडे फिरू देणार नाही. असा इशारा माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना दिला आहे.
ते हदगाव - हिमायतनगर तालुक्यासह हिंगोली लोकसभा मतदार संघात उद्भवलेल्या पुरस्थितीने खचलेल्या बळीराजाला धीर देण्यासाठी पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आल्यानंतर बोलत होते. यंदाच्या अतिवृष्टीने शेतकरी मोठ्या अडचणीत आला आहे, या नुकसानीमुळे तो पुरता खचून गेला आहे. अश्या संकटाच्या काळात त्यांना शासनाने मदतीचा हात देऊन आर्थिक संकटातून बाहेर काढणे अत्यंत गरजेचे आहे. हि बाब लक्षात ठेऊन काल हदगाव तालुक्यात नदीकाठच्या गावात तसेच संपर्क तुटलेल्या गावकऱ्यांशी संवाद साधला. आणि आज हिमायतनगर तालुक्यातील नदीकाठच्या गावकऱ्यांची त्यांनी भेट घेऊन थेट बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली आहे.