शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांचेकडे बाबुराव कदम यांची मागणी
नांदेड| कोविड-19 संक्रमण काळापासून बंद असलेल्या जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील शाळा सुरू करून विद्यार्थ्यांना शिक्षणाची व्यवस्था करून द्यावी. अशी मागणी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांनी शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
महाराष्ट्राचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना अमरावती जिल्हयातील चांदुर तालुक्यातील कुरूळ निवासस्थानी जाऊन बाबुराव कदम कोहळीकर यांनी त्यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा कोविड - 19 मुळे गेल्या मार्च महिन्यापासून बंद आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांना ऑनलाइन शिक्षण पद्धती खूप कठीण जात आहे. बऱ्याच मुलांकडे मोबाईल नाहीत, कुठे नेटवर्क नसते तर कुठे पालकांचे लक्ष नसते. बऱ्याच ठिकाणी आई-वडील निरक्षर आहेत. त्यामुळे मी हदगाव हिमायतनगर तालुक्यातील सरपंच उपसरपंच पोलीस पाटील शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष यांच्याशी चर्चा केली आहे.
त्यांचे म्हणणे आहे की, कुठल्याही परिस्थितीत शाळा सुरू झाली पाहिजे. गावातील शाळा सुरू करण्यासाठी शासनाच्या अटी शर्ती आहेत. त्या नियमांचे आम्ही काटेकोरपणे पालन करून आमच्या जबाबदारीवर शाळा सुरू करा..! आम्ही सरपंच - उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील, शिक्षण समिती अध्यक्ष व सर्व सदस्य दररोज एक व्यक्ती दिवसभरासाठी शाळेवर वेळ देणार आहोत, असे त्यांचे चर्चेअंती मान्य असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.
ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा तात्काळ सुरु करा, अन्यथा ग्रामीण भागातील मुला-मुलींना शिक्षणापासून कायमचे मुकावे लागेल जर वेळीच आपण शाळा सुरू नाही केल्या. तर आम्ही शाळेत जाऊन गावातील सुशिक्षित बेरोजगार तरूणां कडून मुलांना सोबत घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देऊ, नाही तर ग्रामीण भागातील मुले मुली ही पूर्णवेळ गावांमध्येच खेळण्यासाठी गावभर लोकांमध्येच फिरत असतात. त्यामुळे शाळेत जाऊन एका ठिकाणी थांबने हेच कोविड-19 मुळे योग्य राहील, व तसे आम्ही स्वतः काळजी घेऊ असेही निवेदनात म्हटले आहे. कडु यांना निवेगन देतांना कोहळीकरां सोबत विजय वळसे होते. कोहळीकरांच्या या पुढाकाराच पालक वर्गातुन स्वागत होत आहे.