किनवट, आशिष देशपांडे| एका प्रतिष्ठानच्या विरोधात विविध ठिकाणी केलेले तक्रारी अर्ज परत घेण्यासाठी २ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या तिघांविरुद्ध शुक्रवारी ( दि. १८ ) येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील धानोरा ( मक्ता ) येथील रघुनाथ घोडके यांचे किनवट शहरात जय मल्हार प्रतिष्ठान नावाचे कार्यालय आहे.या प्रतिष्ठानच्या माध्यमातून बचत गट चालविण्यात येतात.सदर प्रतिष्ठानच्या माध्यमातून तुम्ही बोगस महिला बचत गट तयार करून हजारो रुपये उकळत आहात, असे म्हणत किनवट येथील तथागत गायकवाड, प्रशांत वाठोरे व मलिक चव्हाण यांनी संगनमताने आधी दि. १ मार्च व त्यानंतर दि.१६ जून रोजी किनवट येथील कार्यालयात येऊन २ लाख रूपये खंडणी मागितली.
तुमच्या प्रतिष्ठानच्या विरोधात विविध ठिकाणी आमच्यामार्फत केलेले तक्रारी अर्ज परत घेण्यासाठी प्रत्यक्ष व मोबाईलवरून २ लाख रुपये मागितल्याची तक्रार रघुनाथ घोडके यांनी दिली होती.त्यानंतर शुक्रवारी घोडके यांनी स्वतः पोलीस ठाण्यात येऊन जबाब नोंदविला.त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तथागत गायकवाड,प्रशांत वाठोरे,मलिक चव्हाण यांच्याविरुद्ध शुक्रवारी रात्री भादंविच्या कलम ३८४,३४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.अधिक चौकशी सहायक पोलीस निरीक्षक राहुलकुमार भोळ करीत आहेत.