अमृताची गोडी घेऊन फळाचाराजा आंबा बाजारपेठेत; ग्राहकांची मागणी
हिमायतनगर, अनिल मादसवार| उन्हाळी ऋतूत अम्रताचा गोडवा देणारा, सर्वांचा आवडता फळाचा राजा आंबा बाजारपेठेत मागील १५ दिवसापासून मोठ्या प्रमाणात दाखल झाला आहे. आजघडीला बाजारपेठेत गावरान अंबा १०० ते ८० रुपये किलो तर सरकारी आंबा ३० ते ७० रुपये प्रती किलो दराने विक्री केला जात आहे.
गतवर्षी झालेल्या अल्प पाऊस तथा वादळी वार्यामुळे फुल गळून फळांचा बहार कमी आला. त्यामुळे थोडक्या प्रमाणात आंबा व टेम्भरे यासह अन्य जंगलातील फळे बाजारात दाखल होत आहेत. तर यंदा चारोळी, रामफळ पाहावयास मिळाली नसल्याने या फळांचा स्वाद कोरोना महामारीमुळे अनेकांना घेता आला नाही. आजघडीला बाजारात आलेल्या गावराणी फळांचे भाव वाडले असून, महागाईच्या काळात गोडवा देणारी फळ खरेदी करणे सामान्य नागरिकांच्या आवाक्या बाहेर झाले आहे. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील आंबा बहरला असताना झालेली अवकाळी, वादळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेला बहार पूर्णपणे झडून गेल्याने प्रचंड नुकसान झाले आहे.
तालुक्यातील महादापूर, पवना, टेंभी, आंदेगाव, सरसम, घारापुर, यासह परिसरातील अन्य शेतकऱ्यांनी शेतात आंब्याची लागवड केलेली आहे. जवळपास त्या सर्वच शेतकऱ्यांच्या शेतातील आंब्याची फळे वादळी वार्याने जमिनीवर पडून प्रचंड नुकसान झाले. याची नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा शेतकर्यांना आहे. झालेल्या नुकसानीमुळे बाजारात गावरान आंब्याची आवक कमी प्रमाणात झाली आहे. त्यामुळे रसाचा गोडवा चाखणे महागल्याचे सामान्य नागरिक व फळ विक्रेत्यांनी वाढोणा न्युज बोलून दाखविले. त्यात सरकारी आंबे बाजारात असल्याने सर्वच जण आंब्याचा गोडवा कमी - अधिक प्रमाणात का होईना चाखत आहेत. बाजारात सरकारी मध्ये हापुस, दशहरी, नीलम, पिवळा बिस्कीट, कलमी, लालघोटी, यासह विविध प्रकारचे आंबे विक्रीस उपलब्ध झाले आहेत. शहरातील पोलीस ठाणे, बाजार चौक, चौपाटी, परमेश्वर मंदिर परिसर, उमर चौक आदी भागात आंबीची दुकाने थाटली गेल्याने सर्वाना आंबा सहजतेने उपलब्ध होत असल्याचे दिसते आहे.