नांदेड (अनिल मादसवार) सध्या धकाधकी व ताणतणावाच्या वातावरणात जगताना आनदांचे क्षण दुर्लभ होत चालले असून याचे महत्वाचे कारण मनुष्य आनंदाचा शोध घेत असतो. तसे न करता आनंद शोधण्यापेक्षा तो निर्माण करा, असे आग्रही प्रतिपादन प्रसिद्ध हास्य कलाकार अॅड. अनंत खेळकर यांनी केले.
नांदेड जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित नांदेड ग्रंथोत्सव 2017 अतंर्गत अकोला
येथील ॲड. खेळकर यांचा तुफान विनोदी कार्यक्रम "माझ्याजवळ बसा खुदुखुदु हसा" चे आयोजन कुसुम सभागृह येथे बुधवारी करण्यात आले होते. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील, अप्पर कोषागार अधिकारी नीळकंठ पांचगे व जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी ॲड. खेळकर यांचे ग्रंथ व स्फुर्तिचिन्हासह स्वागत केले.
ॲड. खेळकर यांनी सभागृहातील प्रेक्षकांवर भुरळ पाडल्यागत सतत दीड तास त्यांची हसवणूक केली. मार्मीक व इरसाल कविता, भन्नाट किस्से, शेरोशायरी यांच्या सादरीकरणासोबतच विनोदातून अंतर्मुखसुध्दा करण्यास त्यांनी भाग पाडले. रोजच्या जीवनात घडत असलेल्या प्रसंगातून विनोद कसा निर्माण होतो वा निर्माण करुन जगणे कसे आल्हाददायक करता येते हे त्यांनी सोदाहरण त्यांच्या उत्तम शैलीतून पटवून दिले. वैदर्भिय, मराठवाडा, पुणे व मुंबई या भागातील पाहुणचाऱ्याच्या पध्दती, राहणीमान, नवरा-बायकोमधील काळानुरुप बदलत जाणारे प्रेम, मुलाच्या गुणवत्तेबाबत वडिलांना असलेला आत्मविश्वास, जुगाड टेक्नॉलाजी, मोबाईला अतिरेकी वापर, या सर्व विषयावर विनोदाची पेरणी करुन त्यांनी सभागृह टाळयांच्या कडकडाटाने व हास्याच्या फुलबाज्याने गजबजून गेले हेाते. ॲड. खेळकर यांच्या या हास्य कार्यक्रमाचा प्रेक्षकांनी मनमुराद आनंद घेऊन ॲड.खेळकर यांच्या विनोदी सादरीकरणाची अमीट छाप सर्व नांदेडकरांच्या मनावर कोरल्या गेली हे मात्र निश्चीत.