नांदेड (अनिल मादसवार) जी माणसं सातत्याने समाजकार्यासाठी वाहून घेतात त्यांना समाजामध्ये सन्मानाबरोबरच सामर्थ्य प्राप्त होते, सेवा करणाऱ्यांचाच इतिहास लिहिला गेला आहे. निंदकांचा इतिहास लिहिला जात नाही, त्यांना गौरव प्राप्त होत नाही, असे प्रतिपादन साहित्यिक प्रा.डॉ. हनुमंत भोपाळे यांनी केले. डॉ. शिवाचार्य मुखेडकर यांच्या प्रेरणेने चालू असलेल्या मानवता विकास विचार मंच, मुखेडच्या वतीने मांजरम येथे आयोजित निर्व्यसनी
समाजनिर्मितीत विचारवंतांची भूमिका या विषयावर व्याख्यानात प्रमुख वक्ते या नात्याने ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहेबराव पाटील जाधव हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. विरूपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर, योगतज्ज्ञ विरभद्र स्वामी, मानवता विकास विचार मंचचे अध्यक्ष विलास चव्हाण, मारोतराव पा. कार्लेकर, संजय हंबर्डे, प्रकाश पवार, हिंगनवाड, मस्कले, बंडे, विनायकराव शिंदे, रामराव शिंदे, अनंतराव मंगनाळे, परमेश्वर केते आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. भोपाळे पुढे म्हणाले की, मानवता विकास विचार मंचाने आतापर्यंत 181 गावांमध्ये जाऊन व्यसनमुक्ती, कर्जमुक्ती, सदाचार आणि राष्ट्र घडवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मूल्यांची पेरणी करण्याचे निरपेक्षपणे केलेले कार्य ही फार मोठी राष्ट्रसेवा असून या कार्यामध्ये युवकांनी सहभागी होणे आवश्यक आहे. युवकांनीच जगामध्ये क्रांती घडवून आणलेली आहे. आज समाजामध्ये कर्जबाजारीपणा वाढत आहे. तो कमी करण्यासाठी उपक्रमशील आणि उद्योगी समाज निर्माण करणे अत्यावश्यक आहे. मतं मिळवण्यासाठी दारू न वाटता, समाजामध्ये विचार वाटून समाज वैचारिकदृष्ट्या संपन्न करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. दारू वाटणाऱ्यांपासून गावं वाचविण्याची सध्या गरज निर्माण झाली आहे. दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. अनेक गावं उद्ध्वस्त होण्याचे मुख्य कारण म्हणजे सततची नापिकी, उद्योग, व्यवसाय, व्यापाराचा अभाव आणि व्यसनाधिनता आहे. या कारणांचे निर्मूलन करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावे लागतील. अच्छे दिन येतील म्हणून वाट न पाहता आपल्या कार्यातूनच आपण संपन्न होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. हनुमंत भोपाळे यांनी केले.
प्रारंभी गावातून प्रभातफेरी काढून शेतकरी वाचवा, देश वाचवा, व्यसनांपासून दूर रहा, व्यसनमुक्त संसार हाच सुखी संसार असे नारे देऊन मानवता विकास विचार मंचच्या सदस्यांनी गावकऱ्यांना विचारमंथनासाठी मांजरम गावातील मारोती मंदिरासमोर येण्याची विनंती करून व्याख्यान कार्यक्रमास प्रारंभ झाला. मान्यवरांच्या हस्ते गावातील बालकांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी डॉ. विरूपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर यांनी सर्वांनी माणूस होण्याचा प्रयत्न करा, व्यसनापासून दूर रहा, सत्कार्यासाठी सहकार्य करा, शारीरिक, मानसिक, सामाजिक, आध्यात्मिक विकास घडवा असा मौलिक उपदेश केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी मालीपाटील यांनी केले, तर आभार रामराव पाटील शिंदे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी साहेबराव जाधव, संभाजीराव शिंदे, प्रल्हाद मरेवार, गणपतराव मालीपाटील, देवराव महाराज केते यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.