अंजली / नंदिनी गायकवाड व रविंद्र खोमणे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण
नांदेड (अनिल मादसवार) २६ नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली वाहण्यासाठी गेल्या नऊ वर्षापासून होत असलेल्या पत्रकार विजय जोशी निर्मित सैनिक हो तुमच्यासाठी....या गीत संगीत नृत्याचा अनोखा कार्यक्रम २६ नोव्हेंबर रोजी शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात आयोजित करण्यात आला असून, झी टिव्हीच्या लिट्ल चॅम्प अंजली व नंदिनी गायकवाड तसेच संगीत सम्राटमध्ये चमकलेला रविंद्र खोमणे हे या कार्यक्रमाचे आकर्षण असणार आहे. नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर गेल्या नऊ वर्षापासून देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी व ती वृध्दींगत करण्यासाठी पत्रकार विजय जोशी सैनिक हो तुमच्यासाठी....हा गीत संगीत नृत्याचा कार्यक्रम आयोजित करतात. यावर्षी देखील हा कार्यक्रम नांदेड येथे शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात २६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. देशभरात नाव कमवलेल्या महाराष्ट्राच्या गोड गळ्याच्या गायिका तसेच लिटल चॅम्पमध्ये विजेतेपद पटकवलेल्या अंजली व नंदिनी गायकवाड या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. तसेच संगीत सम्राटमध्ये चमकलेला व आवाज महाराष्ट्राचा विजेता रविंद्र खोमणे हा देखील या कार्यक्रमात सहभागी होणार आहे. औरंगाबादच्या आरती पाटणकर, वर्धिनी जोशी हयातनगरकर, संजय जगदंबे यांच्यासह अनेक कलावंत यात सहभागी होणार आहेत.
औरंगाबादचे राजू जगदने आणि नांदेडचे सिध्दोधन/महेंद्र कदम व सहकार्याचे संगीत संयोजन असणार आहे. पुण्याच्या नृत्य कलावंतांचा अनोखा आविष्कार या कार्यक्रमात पहावयास मिळणार आहे. प्रख्यात निवेदक गोविंद पुराणिक व नागपूरच्या वैशाली करडे पाळेकर या दोघांच्या दर्जेदार निवेदनात हा कार्यक्रम होणार आहे. नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, कार्यक्रमासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेने देखील सहकार्य केले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांच्या हस्ते होणार असून, जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक मुकुंद केसराळीकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे हे प्रमुख अतिथी असतील. संवाद प्रतिष्ठाणने या कार्यक्रमाची निर्मिती केली असून, सैनिक हो तुमच्यासाठीचा हा ५१ प्रयोग असल्याची माहिती प्रसिध्दीपत्रकाव्दारे देण्यात आली आहे. नांदेडकरांनी या कार्यक्रमाला प्रतिसाद देवून देशभक्तीच्या या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.