अण्णाभाऊ साठे हे विज्ञानवादी विचारवंत होते - चंद्रप्रकाश देगलूरकर

नांदेड (एनएनएल) ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून श्रमिकांच्या तळ हातावर तरलेली आहे असे सांगून अण्णाभाऊ साठे यांनी दैववाद व अंधश्रद्धेचा विचार नाकारला असून ते विज्ञानवादी विचारवंत होते असे प्रतिपादन अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे नेते चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी केले. 

बालाजीनगर, नांदेड येथे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या ९७ व्या जयंती कार्यक्रमात अध्यक्षीय समारोपप्रसंगी चंद्रप्रकाश देगलूरकर बोलत होते. आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष फारुख अहमद यांची यावेळी
प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम महामानवांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. आपल्या भाषणात चंद्रप्रकाश देगलूरकर पुढे म्हणाले कि, अण्णाभाऊ साठे यांचा विचार आणि कार्य समजून घेऊन त्याप्रमाणे वागणे आज गरजेचे आहे. अण्णा भाऊंनी सनातनी विचारांचा विरोध करून गुलामीच्या विरोधात संघर्ष केला. परिस्थिती गरीबीची असली तरी लाचारी किंवा कुणाची जी हुजूरी न करता संघर्ष करणारे बंडखोर धाडसी नायक अण्णा भाऊंनी आपल्या साहित्यातून निर्माण केले आहेत. आज आपण अण्णा भाऊंचे नाव घेऊन सनातनी विचारांची आणि जातीयवाद्यांची गुलामी करणार असाल, देवाधर्माच्या आहारी जाणार असाल, गणपती आणि दुर्गा महोत्सव साजरे करणार असाल तर हा वैचारिक व्यभिचार ठरणार आहे. अण्णा भाऊंनी या सनातनी व्यवस्थेवर घाव घालून आंबेडकरी विचार स्विकारण्याचे आवाहन शेवटी केले होते, हे लक्षात घेऊन आपण कार्य करावे असा समारोप चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी आपल्या भाषणातून केला.

विद्या ही कुणाची मक्तेदारी नसून ती गरिबांच्या झोपडीतही असू शकते हे अण्णा भाऊंनी सिद्ध केले. विद्येची देवता म्हटल्या जाणाऱ्या सरस्वतीने झोपडीतील गरिबांना का शिकविले नाही ? विदयेची खरी देवता सरस्वती नसून सावित्री आहे असे विचार फारुख अहमद यांनी यावेळी मांडले. बालाजी नगर येथील धम्मक्रांती बुद्ध विहाराचे अध्यक्ष परमेश्वर जाधव, बहुजन समता परिषदेचे शहराध्यक्ष बाबुराव लाड, सामाजिक कार्यकर्ते साहेबराव गजभारे, रेड्डी, जी. नागेश, बाबळे, भगवान कोकरे यांनीही यावेळी आपले विचार मांडले. संदीप सोनकांबळे, कमलबाई गायकवाड, कौशल्याबाई वाघमारे, संतोष बोराळकर, खंडेश्वर लिंगायत, गोविंद सावकार, विठ्ठल इंगळे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक संजय गायकवाड यांनी तर सूत्र संचलन मोतीराम सोनकांबळे यांनी केले, जयंती मंडळाचे अध्यक्ष सुनिल गायकवाड, दिनेश गादगे, संतोष उमरे, सचिन धोंडकर, विक्की गवई, कपिल गायकवाड, विक्की वाघमारे, विठ्ठल गादगे आदींनी पाहुण्यांचे स्वागत केले. शेवटी सर्वानी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला.   


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी