आदिवासी वस्तीग्रहातील विद्यार्थांना शिक्षणसाठी भोगाव्या लागतात नरक यातना
नांदेड(अनिल मादसवार)जिल्ह्यातील हिमायतनगर येथील बोरगडी रस्त्यावर असलेल्या शासकीय आदिवासी मुलांच्या वस्तीग्रहात सकाळच्या जेवणासाठी बनविलेल्या अन्नामध्ये आळया निघाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. गेल्या काही महिन्यापासून शिक्षणासाठी नरक यातना भोगाव्या लागत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी पत्रकारासमक्ष दिल्याने अधीक्षक व भोजन व्यवस्थापकाच्या दुर्लक्षित कारभाराचा पर्दाफाश झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवटच्या अंतर्गत हिमायतनगर शहरात आदिवासी मुलाचे वस्तीग्रह हे भाड्याच्या इमारतीत चालविले जात आहे. सदर वस्तीग्रहात १२२ विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी किनवट तालुक्यातील माळबोरगाव येथील स्व.पंचफुलाबाई शिक्षण प्रसारक मंडळाला कंत्राटी तत्वावर प्रशासनाच्या अटी व शर्तीनुसार ठेका देण्यात आला आहे. मात्र गेल्या काही महिन्यापासून येथील निवासी विद्यार्थ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तसेच वस्तीग्रह परिसर घाणीने व्यापला असून, झोपण्यासाठी तुटलेले पलंग, बंद पंखे आणि दार तुटलेल्या बाथरूममुळे विद्यार्थ्यांवर नामुष्की ओढवली जात आहे. असाच काहींसा अनुभव दि.०१ डिसेंबर रोजी विद्यार्थांना आला असून, बुधवारी सकाळच्या जेवणात गोबीची भाजी बनविण्यात आली होती. त्या भाजीमध्ये अक्षरशः आळ्या आढळून आल्या. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून, यातून विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणी कार्यरत असलेले वस्तीग्रह अधीक्षक दमकोंडेकर हे महिन्यातून एखादे दिवसही वस्तीग्रहात हजेरी लावत असल्याचे विद्यार्थी सांगत आहेत.
खरे पाहता अधीक्षक व जेवण बनविणाऱ्या ठेकेदाराने परिपत्रकानुसार दर्जेदार जेवण देणे बंधनकारक आहे. मात्र शासनाचे सर्व नियम धाब्यावर ठेवून आर्थिक देवाण - घेवाण केली जात असल्यामुळे या वस्तीग्रहात अतिशय निकृष्ठ दर्जाचे भोजन दिल्या जात असल्याचे विद्यार्थ्यामधून सागितले जात आहे. येथ विद्यार्थी संख्या १२२ असतांना जेवण व राहण्याची सोय व्यवस्थित नसल्याने आजघडीला केवळ ७० ते ८० विद्यार्थी निवासी वास्तव्याला असतात. शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने विहीर किंवा बोअरवरील दुषित पाण्याने तहान भागवावी लागत आहे. परिणामी विद्यार्थ्यांना साथीच्या रोगाची लागण होत असल्याने उर्वरित विद्यार्थी गैरहजर राहत आहेत. असे असताना देखील त्यांच्या नावाची रक्कम दर महिना उचलण्यात येत असल्याचा आरोप उपस्थित विद्यार्थ्यांनी करून अधीक्षकाच्या कारभाराचे पितळे उघडे केले आहे. शासन निर्णयानुसार दर माह प्रतीविद्यार्थी २ हजार ७४० रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे. दररोज नियमित जेवणात गहू, तांदूळ, भाजीपाला, इत्यादी वस्तूचा वापर करणे बंधनकारक असून, पोळी भाजी, कंदफळ, पालेभाज्या, वरण, भात, कांदा, दही, लोणचे देणे गरजेचे आहे. सकाळी जेवणात नास्त्यासाठी साबुदाणा, उपमा, शिरा, पोहे यापैकी एक १०० ग्रेम, दुध २०० मिली. १५ ग्रेम साखरेसह, दररोज उकडलेली अंडी व शाखाहारी मुलांसाठी ५० ग्रेम वजनाचा बिस्किटचा पुडा प्रत्येक दिवशी ऋतूनुसार फळे वाटप करण्याचे शासकीय परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
तसेच दर आठवड्याला आलटून- पालटून मटण, चिकन प्रती विद्यार्थी २०० ग्रेम रविवारी सोबत कांदा, लिंबू, तसेच शाकाहारी विद्यार्थ्यांसाठी दर रविवारी एक वेळ १५० ग्रेम स्वीट (गोड पदार्थ), बासुंदी जिलेबी, बालुशाही, श्रीखंड, गुल जमून, यापैकी एक, नियमित जेवणात द्यावे. आणि आलटून - पालटून सलाड देणे बंधनकारक आहे. असा शासनाचा नियम असताना मात्र येथील मुलांच्या वस्तीग्रहात मात्र यापैकी एकही आट मान्य केल्या जात नाही. आलू किंवा गोबी अश्यापैकी एकाच पदार्थाची भाजी ती सुद्धा केवळ हळद चटणी मीताच मारा देवून विद्यार्थ्यांना खाऊ घातले जात आहे. विद्यार्थ्यांच्या नावे आलेले वरदान व भोजन व्यवस्थापक वाटून खाऊन गलेलट्ठ होत असल्याच्या त्यांच्या कारभारावरून दिसून येत आहेत. येथील वार्डन ( अधीक्षक - दमकोंडेकर ) हे गेल्या ५ वर्षापासून ठाण मांडून बसलेले असून, ते सुधा नांदेड सारख्या शहरात राहून येथे अमावस्या - पौर्णिमेला चंद्राप्रमाणे येवून आपली पगार घट्ट करीत आहेत. अश्या बेजबाबदार कर्मचार्यावर निलंबनाची कार्यवाही करावी. आणि ज्यांच्या नावे भोजन बनविण्याचा परवाना आहे. त्यांचा परवाना तत्काळ रद्द करून शासन परिपत्रकानुसार सकस आहार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी येथील निवासी विद्यार्थ्यांनी केली आहे.
------------------------
मागील काही महिन्यापासून वस्तीग्रहातील साहित्य, बाथरूम, स्वयंपाक घर आणि परिसर घाणीने व्यापला आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी अधीक्षकाकडे वारंवार तक्रारी करूनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी नरक यातना भोगत घाणीत वास्तव्य करावे लागत आहे. आठ दिवसापूर्वी वस्तीग्रह परिसरात एक वराह मयत होऊन दुर्गंधी सुटली होती. तरीही सदरील अधीक्षकाने याकडे लक्ष दिले नसल्याने दुर्गंधीचा त्रास सहन करत विद्यार्थ्यांना जेवल करावे लागले आहे.
घटनेची चौकशी करणार - डॉ. राजेंद्र भारुड
-----------------------
याबाबत प्रकल्प अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि, सदर घटनेच्या तपासणीसाठी तत्काळ पथक पाठवून चौकशी केली जाईल. तसेच दोषी आढळल्यास भोजन व्यवस्थापक व वस्तीग्रह वार्डन यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.
याबाबत अधीक्षक एस.डी. दमकोंड कर यांच्याशी संपर्क साधून विचारपूस केली असता वस्तीग्रहातील समस्या व आज जेवणात निघालेल्या आल्याबद्दल उत्तर देताना उपस्थित विद्यार्थ्यासमोर त्यांची बोलतीच बंद झाल्याचे दिसून आले.