नांदेड। लोहा ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर झाल्याने लोहा शहरासह तालुक्यातील नागरिकांत आनंदाचे वातावरण पसरले होते.मात्र सदरील उपजिल्हा रुग्णालय हे शहरापासून 2 किमी बाहेर गेल्यामुळे उपचारार्थ ये-जा करताना रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
पूर्वीच्या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीमध्येच बाह्यरुग्ण विभाग पूर्ववत सुरू करून रुग्णाची हेळसांड थांबवावी अशी मागणी काँग्रेसचे लोहा शहराध्यक्ष वसंत पवार व काँग्रेसचे युवा नेतृत्व तथा माजी नगराध्यक्ष सोनू संगेवार यांनी जिल्हाधिकारी नांदेड यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
लोहा ग्रामीण रुग्णालय हे राष्ट्रीय महामार्गावरील एक महत्त्वपूर्ण रुग्णालय आहे.यापूर्वी याच रुग्णालयात बाजूच्या पालम,गंगाखेड,कंधार,अहमदपूर व इतर ठिकाणाहून रुग्ण उपचारासाठी लोहा ग्रामीण रुग्णालयात येत असत.सदरील रुग्णालयावरील रुग्णाचा लोंढा पाहता ग्रामीण रुग्णालयाचे रूपांतर उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. लोहा-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील बेरळी फाटानजिक उपजिल्हा रुग्णालयांची सुसज्य इमारत पूर्णत्वास गेली आहे. त्यामुळे प्रारंभी लोहा वाशीयांचा द्विगुणित झालेला आनंद काही काळच टिकला. लहानसहान आजारासाठी उपजिल्हा रुग्णालयात जाणे रुग्णासाठी मोठे जिकिरीचे ठरत आहे.
परिणामी रुग्णाची मोठी हेळसांड होत आहे.सदरील बाह्यरुग्ण विभाग पूर्वीप्रमाणेच शहरातील ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीत चालू ठेवावा व रुग्णाची होणारी हेळसांड थांबवावी,अशी मागणी काँग्रेस कमिटीचे लोहा शहराध्यक्ष वसंत पवार तसेच काँग्रेसचे युवा नेतृत्व तथा माझी उपनगराध्यक्ष सोनू संगेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी नांदेड याना दिलेल्या निवेदनातून केली आहे.यावेळी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे लोहा तालुकाध्यक्ष शरफोद्दीन शेख, माजी नगरसेवक पंकज परिहार, माजी नगरसेवक अनिल दाढेल सह काँग्रेसचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.