नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील सहा. प्राध्यापक श्रीमती उषा सावळाराम सरोदे, सेवक गौतम चिकाटे आणि विद्यापीठ फंडातील मजूर भिमराव कांबळे दि. ३० एप्रिल रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेले आहेत.
यानिमित्त विद्यापीठातील अधिसभा सभागृहामध्ये दि.३० एप्रिल रोजी निरोप समारंभानिमित्त सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन सहकुटुंब सत्कार केला. यावेळी व्यासपीठावर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवि सरोदे, उपकुलसचिव व्यंकट रामतीर्थे यांची उपस्थिती होती.
श्रीमती उषा सरोदे १९९६ ला विद्यापीठामध्ये सामाजिकशास्त्र संकुलात सहा. प्राध्यापक या पदावर रुजू झाल्या होत्या. त्यांनी रुजू दिनांकापासून आजपर्यंत एकूण २५ वर्ष सेवा विद्यापीठाला दिली. पण त्यांच्या काही वैयक्तिक अडचणीमुळे त्या या कार्यक्रमास हजर राहू शकल्या नाहीत. गौतम चिकाटे हे १९९६ पासून सेवक पदावर काम करीत होते. त्यांनी जवळपास २६ वर्षे या विद्यापीठाला आपली सेवा दिली. त्यांनी आपल्या कार्यकाळात भूशास्त्र संकुल, आस्थापना विभाग, लातूर येथील उपकेंद्र इ. ठिकाणी सेवा दिली.
भिमराव कांबळे यांनी २०११ ते २०१३ पर्यंत ठराविक वेतन कर्मचारी व २०१३ पासून विद्यापीठ फंड वेतनश्रेणीवर मजूर म्हणून अशी एकूण १० वर्ष सेवा त्यांनी विद्यापीठाला दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. वैजनाथ अनमूलवाड यांनी केले. या कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.