क्षेत्रिय महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्‍न -NNL


नांदेड।
 
महसूल जमीन महसूल अधिनियम 1966 मधील  विविध कलमांमध्‍ये  नवीन सुधारणा झालेल्‍या आहेत. या सुधारणांची क्षेत्रिय स्‍तरावरील  महसूल अधिकारी व कर्मचारी यांना परिपूर्ण  माहिती असणे आवश्‍यक आहे. महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील विविध तरतुदींची तसेच शासनाच्‍या  विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्‍यासाठी  कार्यरत महसूल अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षीत असणे आवश्‍यक आहे. त्या अनुषंगाने जिल्‍हाधिकरी अभिजीत राऊत व अपर जिल्‍हाधिकारी पी. एस. बोरगावकर यांच्या संकल्पनेतुन  8 डिसेंबर 2022 रोजी नियोजन भवन नांदेड येथे क्षेत्रिय महसूल अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण आयोजित करण्‍यात आले  होते.

महसूल अधिकारी / कर्मचारी  यांना कायदयाचे सखोल ज्ञान, माहिती  असेल  तर कायदयाची प्रभावी पणे अंमलबजावणी करणे सोपे होते. महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 42 मध्‍ये 42 अ, 42 ब, 42 क, 42 ड  नव्‍याने समाविष्‍ट करण्‍यात आलेले आहेत.  तसेच  या नियमान्‍वये केलेल्‍या सुधारणा Ease of Doing Business व शासनाच्‍या उत्‍पन्‍नाच्‍या अनुषंगाने महत्‍वाचे असल्‍याने नियमाची तात्‍काळ प्रभावीपणे अंमलबजावणी होणे आवश्‍यक असल्याने हे प्रशिक्षण आयोजित करण्‍यात आले  होते.

या प्रशिक्षणात  उपविभागीय अधिकारी धर्माबाद राजेंद्र शेळके यांनी महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम  42-ब, 42-क व 42-ड  मधील तरतुदीची परिपूर्ण माहिती दिली. बिलोलीचे उपविभागीय अधिकारी सचिन गिरी यांनी  पोटखराब क्षेत्र लागवडी योग्‍य क्षेत्रात  आणणे बाबतची कार्यपध्‍दती, संगणकीकृत सातबारा वरील कालबाहय नोंदी कमी करणे.  तसेच अकृषिक  सातबारा वेगळा करणे बाबतची पध्‍दती याविषयी सखोल मार्गदर्शन केले. उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी  डिजिटल  इंडिया  भूमि अभिलेख  आधुनिकीकरण  कार्यक्रम व (DILRMP) व ई-चावडी याविषयी  उपस्थितांना मार्गदर्शन केले.

अपर जिल्‍हाधिकारी पी.एस.बोरगावकर यांनी  वर्ग- 2 जमीनीचे व्‍यवस्‍थापन (इनाम, अतियात, कुळ, सिलींग जमीन ) इत्‍यादी बाबतच्‍या कायदयाची  सविस्‍तर माहिती दिली. उपजिल्‍हाधिकारी (रोहयो) अनुराधा ढालकरी यांनी  महाराष्‍ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने बाबतचे सविस्‍तर प्रशिक्षण दिले.

जिल्‍हा अधिक्षक भूमी अभिलेख श्रीमती सुरेखा सेठीया यांनी  नगर भूमापन झालेल्‍या भागातील दुहेरी नोंद पध्‍दत बंद करणे बाबतचे सादरीकरण सादर करुन उपस्थितांना याविषयी सखोल मार्गदर्शन केले. जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आपल्‍या मनोगतात प्रशिक्षणाचे महत्‍व विषद करुन  शासनाच्‍या योजनांची परिपूर्ण माहिती कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांना असली पाहिजे. जेणेकरुन  सदर योजना शेवटच्‍या घटकापर्यंत प्रभावीपणे राबविणे सोपे होते. अधिकारी, कर्मचारी यांनी विकासात्‍मक दृष्टिकोन बाळगुन जनतेचे विविध  प्रश्‍न, अडचणी सोडविण्‍याचा प्रयत्‍न करावा. कार्यालयीन कामकाज शिस्‍तबध्‍द व चाकोरीने करावे.  कार्यालयीन कामकाजात सुलभता असावी.  कार्यालय नेहमी स्‍वच्छ असावे  अशी अपेक्षा व्‍यक्‍ती केली.

या प्रशिक्षणास  सहायक जिल्‍हाधिकारी किनवट नेहा भोसलेअपर जिल्‍हाधिकारी पी. एस. बोरगावकर, जिल्‍हा अधिक्षक भूमी अभिलेख श्रीमती सुरेखा सेठीया, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार,  उप‍ अधिक्षक भूमी अभिलेख, नायब तहसिलदार,  मंडळाधिकारी,  अव्‍वल कारकुन, महसूल सहायक तलाठी इत्‍यादी  अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. हे प्रशिक्षण यशस्‍वी होणेसाठी  अपर जिल्‍हाधिकारी पी.एस. बोरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्‍हाधिकारी लतिफ पठाण, तहसिलदार (महसूल)  विजय अवधाने, अव्‍वल कारकुन गोपाळ धसकनवार यांनी परिश्रम घेतले.  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन, आभार अव्‍वल कारकुन प्रसाद शिरपुरकर यांनी मानले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी