नांदेड| सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2022 संकलन शुभारंभ आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमास मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर आदी उपस्थितीत होते. सन 2021-22 मधे नांदेड जिल्ह्यास रुपये 45 लाख 30 हजार संकलनाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. जिल्ह्याने हे उद्दिष्ट 100 प्रतिशत पुर्ण केले. या कार्याची दखल घेत शासनाने नांदेड जिल्ह्यास उत्कृष्ट निधी संकलनासाठीचे स्मृतीचिन्ह प्रदान केले आहे.
सशस्त्र सेना ध्वजदिन निधी 2021 साठी उत्कृष्ट संकलन करणाऱ्या जिल्हयातील सर्व कार्यालय प्रमुख/कर्मचाऱ्यांना/ सह संस्था तसेच दानशुर व्यक्तींना या कार्यक्रमात प्रशस्तीपत्रके व स्मृती चिन्हे भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून जिल्ह्यातील वीरपत्नी, वीर माता, वीरपिता व विशेष गौरव पुरस्कार प्राप्त पाल्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास कार्यालय प्रमुख, माजी सैनिक संघटना अध्यक्ष व विरनारी/विरमाता/विरपिता व माजी सैनिक मोठया संख्येने उपस्थित होते. निवासी उपजिल्हाधिकारी व जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी महेश वडदकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीतेसाठी अर्जुन जाधव, बुधसिंग शिसोदे, बालाजी भोरगे, सूर्यकांत कदम व मदन जोगदंड यांनी परिश्रम घेतले.