राज्यभरातील महिला कलावंतांनी गाजवला सैनिक हो तुमच्यासाठी.....NNL

मुंबई पोलिस दलातील अधिकारी व जवानांच्या बलिदानामुळे व सुरक्षेमुळे २६/११ च्या हल्ल्यात मुंबईतील इतर लोक सुरक्षित राहू शकले-पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे


नांदेड|
पोलीस अधिकारी, जवान, नागरिक मुंबईच्या हल्ल्यात शहीद झाल्यानंतर पोलिसांनी ज्या जिद्दीने व देशभक्तीने धडाडीने काम केले आणि या हल्ल्यातील उरलेल्या दहशतवाद्यांना अटक केली. त्यामुळे पोलिसांच्या जिद्दीचे कौतूकच करायला हवे, हा हल्ला भ्याड तर होताच मात्र अतिरेकी यंत्रणा कुठल्या स्तराला जाते,  याचे हे उदाहरण असून, यापुढे असे हल्ले होऊ शकणार नाहीत, असा विश्वास नांदेडचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी व्यक्त केला.

मुंबईवर २६/११ ला झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या १४ वर्षापासून सातत्याने पत्रकार विजय जोशी यांच्या पुढाकारातून आणि नांदेड जिल्हा पोलीस दल व संवाद बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात सैनिक हो तुमच्यासाठी हा देशभक्तीपर गितांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.


या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते झाले. तर प्रमुख अतिथी म्हणून मनपा आयुक्त डॉ.सुनील लहाने, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, प्रख्यात साहित्यिक देविदास फुलारी, प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोडे आदींची उपस्थिती होती. मुंबईतील पोलीस दलातील शूर अधिकारी व जवानांनी आपले जीवन बलिदान केले म्हणून मुंबईतील सर्व लोक इतर लोक सुरक्षित राहू शकले. अंतर्गत सुरक्षेमध्ये पोलिसांचे कार्य सामान्य जनतेला कधीच विसरता येणार नाही. त्यामुळे पोलिसांना त्यांनी नेहमी सहकार्य करणे गरजेचे आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

जिल्हाधिकारी राऊत म्हणाले की, एखाद्या उपक्रमामध्ये सातत्य ठेवून तो दरवर्षी सादर करणे हे अवघड काम मात्र देशभक्तीची भावना जनमानसात रुजावी यासाठी असे उपक्रम चालू ठेवणे ही अभिमानाची बाब आहे. देविदास फुलारी यांनी आपल्या भाषणात देशभक्तीच्या भावनेने ओतप्रोत असलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांनी तसेच विविध कार्यक्रम सादर करुन नांदेडची सांस्कृतिक भूक भागविण्याचा शहरातील कलावंत वेगवेगळ्या पध्दतीने प्रयत्न करतात, त्यातलाच हा सातत्यपूर्ण प्रयोग असल्याचे मत व्यक्त केले. सुरुवातील मान्यवरांच्या हस्ते भारतमातेचे पूजन करुन व दिपप्रजल्वन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. उद्घाटकीय सत्राचे सूत्रसंचालन अ‍ॅड.गजानन पिंपरखेडे यांनी केले.


राज्यभरातील महिला कलावंतांनी गाजवला सैनिक हो तुमच्यासाठी....या कार्यक्रमाचे वैशिष्ट्ये म्हणजे यावेळी व्यासपीठावर सर्व महिला कलावंत उपस्थित होत्या. पत्रकार विजय जोशी यांनी दरवर्षीच कार्यक्रमाचे वेगळे वैशिष्ट्ये जपले आहे. राज्यभरातील महिला कलावंत सौ.ज्योती गोराणे-आळंदी, आसावरी रवंदे-जोशी-मुंबई, राधिका साकोरे-केंदूर, पुजा वाणी-आळंदी देवाची, लक्ष्मी कुडाळकर-पुणे, प्राजक्ता उकीरडे-अहमदनगर, प्रिया वझे-मुंबई, देवयानी मोहोळ-मुंबई, ज्ञानेश्वरी क्षीरसागर-आळंदी, दिपाली संजय आवाळे-नांदेड या कलावंतांनी सहभाग नोंदविला. तर महाराष्ट्राच्या प्रख्यात निवेदिका श्रध्दा वरणकार यांनी उत्कृष्ट निवेदन करुन २६/११ च्या आठवणी जागवल्या. कार्यक्रमाचे वैशिष्ट्ये म्हणजे लक्ष्मी कुडाळकर या पुण्याच्या ढोलकी पटूने तब्बल २४ मिनिटे ढोलकी वाजवून रसिकांना मंत्रमुग्ध केले. 

गायिका ज्योती गोराणे, आसावरी रवंदे-जोशी, राधिका साकोरे, पुजा वाणी यांनी सैनिक हो तुमच्यासाठी, हिच आमुची प्रार्थना, वेदमंत्राहून आम्हा, जयोस्तुते, ये मेरे वतन के लोगो, हर करम अपना करेंगे, देश मेरा रंगीला, ही माय भूमी, संदेशे आते है, माझी मैना गावाकडं राहिली, परवर दिगार, ये वतन वतन आबाद रहे तू ही एकापेक्षा एक सरस गाणी सादर करुन देशभक्तीची भावना जागृत केली. प्रत्येक गाण्याला उपस्थित प्रेक्षकांनी भारत माता की जयचा जयघोष केला. कार्यक्रमात नटेश्वर कथ्थक नृत्यालयाच्या संचालिका दिपाली आवाळे यांच्या शिष्य गणांनी देशभक्तीपर नृत्य सादर केले. शेवटी सर्व समुहाच्या वतीने मिले सुर मेरा तुम्हारा या गिताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अ‍ॅड. गजानन पिंपरखेडे, बापू दासरी, विजय बंडेवार, दिपक बार्‍हाळीकर, गंगाधर हाटकर, आनंद सावरकर, कमलाकर कांबळे, मंजूषा चौधरी आदींनी परिश्रम घेतले.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी