जिल्ह्यातील 5 लाख 61 हजार 582 लाभधारकांना; आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ -NNL


नांदेड|
सामाजिक आर्थिक जातीय जनगणना 2011 आधारित विशिष्ठ निकषांनुसार निवडलेल्या लाभार्थी कुटुंबातील सदस्यांना विविध गंभीर आजारांवर उपचार करता यावेत या उद्देशाने राज्य व केंद्र सरकारने विशेष योजना सुरू केलेली आहे. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत गंभीर आजारांवर पात्र लाभार्थ्यांना सुमारे 5 लाख रुपये प्रती कुटूंब प्रती वर्षे मर्यादेत मोफत उपचार उपलब्ध करून दिले आहेत. याअंतर्गत जिल्ह्यातील सुमारे 5 लाख 61 हजार 582 लाभधारकांना या योजनेच्या कक्षेत घेण्यात आले आहे. 

ही योजना प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहचावी यासाठी आरोग्य विभागासह राज्य आरोग्य हमी सोसायटीतर्फे संपूर्ण जिल्हाभर जागृती करण्यात येत आहे. प्रत्येक गावातील आशावर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक यांच्यामार्फत ही योजना पोहचविली जात असल्याची माहिती सोसायटीचे जिल्हा समन्वयक डॉ. दिपेश कुमार शर्मा यांनी दिली. 

सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना विविध गंभीर आजारानुसार 34 विशेष तज्ज्ञांकडे शासकीय अथवा खाजगी दवाखाण्यात उपचार घेता येतात. याचबरोबर सुमारे 1 हजार 38 उपचार खाजगी रुग्णालयात तसेच 171 उपचार पद्धती या शासकीय रुग्णालयाअंतर्गत योजनेच्या नियमानुसार उपलब्ध तज्ज्ञांकडे मोफत घेता येतील. यात प्रामुख्याने सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, लहान मुलांचे कर्करोग, मानसिक आजारावरील उपचार यांचा समावेश आहे. यासाठी आयुष्यमान कार्ड असणे आवश्यक आहे. 

इथे मिळतील आयुष्यमान कार्ड

या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक पात्र लाभार्थ्याकडे आयुष्यमान कार्ड असणे आवश्यक आहे. ज्या कुटुंबाची नावे सामाजिक आर्थिक जातीय जनगणना 2011 आधारीत विशिष्ट निकषानुसार निवडलेले आहेत त्या कुटुंबातील सदस्यांना हे कार्ड खालील ठिकाणी मोफत मिळेल. यात संलग्नीकृत रुग्णालय असलेले आधार हॉस्पिटल, अपेक्षा हॉस्पिटल, संजीवनी हॉस्पिटल, श्री गुरूजी रुग्णालय, श्री सिद्धी विनायक हॉस्पिटल, विनायक हॉस्पिटल, लव्हेकर हॉस्पिटल, आढाव हॉस्पिटल, अष्टविनायक हॉस्पिटल, गायकवाड हॉस्पिटल, तुकामाई हॉस्पिटल, चिंतामणी हॉस्पिटल, गोदावरी हॉस्पिटल, उमरेकर हॉस्पिटल, नांदेड क्रिटीकल केअर हॉस्पिटल, भक्ती हॉस्पिटल, आशीर्वाद हॉस्पिटल, सहयोग हॉस्पिटल, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय, श्री गुरूगोबिंदसिंघजी स्मारक जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय मुखेड, देगलूर, गोकुंदा किनवट, कंधार, भोकर, नायगाव, स्त्री रुग्णालय नांदेड आदी ठिकाणी रुग्णालयात आरोग्य मित्रामार्फत हे कार्ड मोफत काढून दिले जातात. याचबरोबर आपल्या जवळील कॉमन सर्व्हीस सेंटर, ग्रामपंचायत अंतर्गत आपले सरकार सेवा केंद्र, यु.टी.आय. आय.टी.एस.एल. केंद्र येथे कार्ड बनून दिले जाते. 

आयुष्यमान कार्डासाठी ही लागतात कागदपत्रे

पात्र लाभार्थ्यांना आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी मुळ शिधापत्रिका असणे आवश्यक आहे. याचबरोबर आधार कार्ड आणि ओटीपीसाठी मोबाईल सोबत असणे आवश्यक आहे. आपले सरकार सेवा केंद्र, ग्रामस्तरीय सुविधा केंद्र व वर नमूद करण्यात आलेल्या संलग्न रुग्णालयाच्या ठिकाणी उपलब्ध असलेले आरोग्य मित्र हे कार्ड मोफत काढून देतील. कुटुंबाचे नाव यादीत आहे किंवा नाही यासाठी  https://mera.pmjay.gov.in या संकेतस्थळावर किंवा 14555 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधल्यास खात्री करून घेता येते. गावनिहाय, वार्ड निहाय यादी पाहण्यासाठी https://aapkedwarayushman.pmjay.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन पाहणी करता येईल. यात अडचण भासत असेल तर संलग्नीत रुग्णालयातील आरोग्य मित्राशी संपर्क साधता येईल.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी