हदगाव। हदगाव तालुक्याचे माजी प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी आणि तालुक्याचे कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया सर्जन असलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. एल. कदम यांच्याच आष्टी प्राथमिक आरोग्य केंद्रातील जूने, नवे दोन्ही ऑपरेशन थिएटर मागील तीन वर्षांपासून बंदच असल्याने येथील कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया व इतर शस्त्रक्रिया अक्षरशः बंदच असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून जिल्हा व तालुका आरोग्य विभागाचे कमालीच्या दुर्लक्षाने रूग्णांची हेळसांड होत आहे.
हदगाव तालुक्यातील आष्टी प्राथमिक आरोग्य केंद्राला सर्व सोयीनीयुक्त भव्य इमारत बांधण्यात आली. इमारतीबरोबरच सुसज्ज ऑपरेशन थिएटर बांधण्यात आले होते. परंतु जूने ऑपरेशन थिएटर दुरुस्तीला आल्याने येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मागणीनुसार नांदेड जिल्हा परिषदेने तीन वर्षांपूर्वी दुरुस्तीऐवजी नवीन ऑपरेशन थिएटर बांधकामासाठी निधी उपलब्ध करुन दिला होता. परंतु ज्या गुत्तेदराला हे काम देण्यात आले होते. त्या गुत्तेदारांने ऑपरेशन थिएटरचे काम अर्धवट ठेवून बिले लाटल्याचा धक्कादायक प्रकार केल्याचे सांगण्यात आले.
असे असताना आरोग्य विभागाच्या कोणत्याही कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी नव्या ऑपरेशन थिएटरचे बांधकाम पूर्ण झाल्याची खात्री करण्याची व ऑपरेशन थिएटर चालू झाले की, नाही. याची तीन वर्षात कधीच खात्री केली नाही. याचाच अर्थ जिल्हा आरोग्य विभागाने तीन वर्षात कधीच आष्टी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली नसल्याचे पितळ उघडे पडले आहे.प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी म्हणून हदगावचा अनेक वर्ष पदभार सांभाळलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. कदम यांच्याकडे आष्टी प्राथमिक आरोग्य केंद्राचा पदभार आहे. पण त्यांच्याच आष्टी प्राथमिक आरोग्य केंद्रातील जूने आणि नवे दोन्ही ऑपरेशन थिएटरची दुरावस्था होऊन तीन वर्षांपासून ते बंद राहणे योग्य आहे का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. ही अत्यंत गंभीर बाब असल्याने आरोग्य विभागाबरोबरच येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना देखील रुग्णांना होणाऱ्या त्रासाचे काहीच देणघेणे नसल्याचे यावरून सिद्ध होते. येथे होणाऱ्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया सध्या तरी बंद असून, जवळच्या वायपणा प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा हदगाव उपजिल्हा रुग्णालयात केल्या जात असल्याचे येथील वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
त्यामुळे महिला रूग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची चांगलीच फरफट व हेळसांड होत आहे. डॉ. कदम हे कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया करणारे सर्जन असून तामसा, वायपणा आणि ईतर ठिकाणी तेच शस्त्रक्रिया करतात. तालुक्यातील आरोग्याची व शस्त्रक्रियेची जबाबदारी सांभाळणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्याच आष्टी प्राथमिक आरोग्य केंद्रातील ऑपरेशन थिएटर दुरुस्ती अभावी तीन तीन वर्षांपासून बंद राहणे म्हणजे आरोग्य विभागाच्या गलथान कारभाराची लखतरे वेशीला टांगण्याचाच प्रकार मानला जातो. आरोग्य विभागाच्या अशा गलथान कारभाराबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
राज्याच्या आरोग्य सचिवपदी डॉ. तुकाराम मुंडेंच्या नियुक्तीनंतर आरोग्य यंत्रणा अलर्ट होऊन आरोग्य विभागाचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी, जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. निना बोराडे, जिल्हा आयुष अधिकारी डॉ. संदेश जाधव यांच्या वेगवेगळ्या पथकाने ऑक्टोबर महिन्यात सलग दोन दिवसात दोन वेळा तामसा प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन वैद्यकीय कारभार सुरळीत करण्याच्या कडक सूचना केल्या होत्या. मात्र या पथकाने जवळच असलेल्या आष्टी व वायपना प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन तेथील रामभरोसे कारभाराची पाहणी केली नसल्याने उलटसुलट चर्चेला तोंड फुटले आहे. आमच्या प्रतिनिधींनी डॉक्टर यांच्याशी विचारणा केली असता त्यावर त्यांनी बोलण्यास टाळलं व त्या गोष्ट ला तिथेच विराम दिला.