रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गासाठी मानवी साखळी आंदोलन करीत पत्रकारांनी वेधले शासनाचे लक्ष -NNL

उच्चस्तरीय समिती नेमून चौकशीची केली मागणी ; एक महिन्यात महामार्ग दुरुस्त करण्याचा दिला अलटीमेटम!


मुंबई/रोहा।
चौपदरीकरणाचे काम रखडल्याने आणि दुरावस्था झालेल्या मुंबई गोवा महामार्गाचे काम त्वरित सुरू करण्याच्या मागणीसाठी रायगड जिल्ह्यातील पत्रकारांनी मुंबई गोवा महामार्गावर कोलाड नाका येथे मानवी साखळी आंदोलन करीत सरकारचे लक्ष वेधून घेतले. 

मराठी पत्रकार परिषदचे मुख्य विश्वस्त, ज्येष्ठ पत्रकार एस एम देशमुख यांच्या नेतृत्वाखालील हे आंदोलन करण्यात आले. मंजुरीनंतर 11 वर्षे रखडलेल्या या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाची उच्चस्तरीय समिती गठीत करून चौकशी व्हावी आणि दोषी ठेकेदार, अधिकारी व संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. पत्रकार आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभाग घेतला. 


मुंबई गोवा महामार्गावरील वाढते अपघात रोखण्यासाठी यामार्गाचे चौपदरीकरण करण्यात यावे यामागणीसाठी रायगड जिल्ह्यातील पत्रकारांनी मुंबई गोवा महामार्गावर मानवी साखळी आंदोलन केले. रायगड मधिल पत्रकारांसह समाजसेवि संस्था आणि नागरिकांनी यावेळी मोठया संख्येने या आंदोलनात सहभाग घेतला. सकाळी दहा वाजल्यापासूनच कोलाड नाक्यावर जिल्ह्यातिल पत्रकार जमू लागले होते. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार एस एम देशमुख यांच्या सह मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, माजी अध्यक्ष गजानन नाईक, माजी कोषाध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष भारत रांजणकर, जिल्हा पत्रकार संघाचे नागेश कुलकर्णी, माजी अध्यक्ष अभय आपटे, विजय मोकल, अनिल भोळे आदी उपस्थित होते. तर आमदार अनिकेत तटकरे, शिवसेना रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे, रोहा सिटीझन फोरमचे अध्यक्ष नितीन परब, आप्पा देशमुख आदींसह विविध सामाजिक संघटनांनी यावेळी उपस्थित राहून आंदोलनात आपला पाठिंबा दिला. 


सकाळी ११ वाजेपर्यंत मोठ्या संख्येने पत्रकार व नागरिक आंदोलन स्थळी जमा झाले. यावेळी पोलिसांची मोठी कुमक बोलावण्यात आली होती. साडेअकरा वाजता महामार्गावर मानवी साखळी करण्यात आली. अर्ध्या तासाने महामार्गाचे प्रकल्प संचालक यशवंत व्होटकर हे रोहा तहसीलदार कविता जाधव यांच्यासमवेत आंदोलनस्थळी आले, चौपदरीकरणाचे कामाबाबत अधिकाऱ्यांनी माहिती दिली, येत्या एक महिन्यात रस्ता सुस्थितीत करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. मात्र त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने याविषयावर बैठक घेण्याचे ठरले. तसेच पुढील एक महिन्यात महामार्ग दुरुस्त करण्याचे अलटीमेटम यावेळी अधिकाऱ्यांना देण्यात आले. मागण्यांचे निवेदन दिल्यानंतर या आंदोलनाची सांगता झाली.

आम्ही सनदशीर मार्गाने या रस्त्यासाठी आंदोलन केलेले आहे, पुढील एक महिन्यात मुंबई गोवा महामार्ग सुस्थितीत न केल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल, कोकणातिल पत्रकार पुन्हा रस्त्यावर उतरून शासनाला जाब विचारतील - एस एम देशमुख, मुख्य विश्वस्त मराठी पत्रकार परिषद

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी