भारत जोडो यात्रा ‘मन की बात’ची यात्रा नाही, जनतेच्या चिंतेची यात्रा!: जयराम रमेश -NNL

नांदेडमध्ये उद्या जाहीरसभा, मल्लिकार्जून खर्गे व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार: अशोक चव्हाण

भारत जोडो यात्रेवर भाजपाची नाहक टीका, भ्रष्टाचाऱ्यांनाच भ्रष्टाचार दिसतो: नाना पटोले

भारत जोडो यात्रेत महाराष्ट्रातील ९ भारतयात्रींचा कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत सहभाग.


नांदेड| 
भारत जोडो यात्रा ही राजकीय यात्रा नसून राजकीय फायद्या-तोट्यासाठीही नाही. विरोधकांचे आरोप बिनबुडाचे असून पहिल्या दिवसांपासून विरोधक टीका करत आहेत त्याला काँग्रेस महत्व देत नाही. पदयात्रेला मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस प्रचंड आहे. ही यात्रा ‘मन की बात’ ची यात्रा नसून ‘जनतेच्या चिंते’ची यात्रा आहे, असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाचे प्रमुख जयराम रमेश यांनी सांगितले.

नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथे ते पत्रकारांशी संवाद साधत होते. या पत्रकार परिषदेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, सचिन सावंत, डॉ. राजू वाघमारे आदी उपस्थित होते.

भारत जोडो यात्रेसंदर्भात माहिती देताना जयराम रमेश पुढे म्हणाले की, कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत निघालेली ही पदयात्रा देशातील विदारक परिस्थिती जनतेला अवगत करण्यासाठी आहे. देशात सध्या असलेली आर्थिक विषमता, समाजिक धृवीकरण व राजकीय हुकूमशाहीच्या विरोधात आहे. महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्थेची घसरण यासाह सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ही पदयात्रा आहे. राहुलजी गांधी दररोज शेतकरी, तरुण, महिला, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, छोटे व्यापारी यांच्या समस्या, व्यथा जाणून घेत आहेत.

महाराष्ट्रात पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत ६३ दिवस, ६ राज्ये व २७ जिल्ह्यातून ही पदयात्रा मार्गक्रमण करत पदयात्रेचे अर्धे अंतर पार केलेले आहे. पदयात्रेला मिळालेला प्रतिसाद पक्ष संघटना बळकट होण्यास मदत होत आहे. लोकांमध्ये राहुलजी गांधी यांच्या पदयात्रेबद्दल मोठा उत्साह दिसून येत आहे. काँग्रेसचे समर्थकच नाही तर विरोधकही या पदयात्रेला पाठिंबा देत आहेत. भारतीय जनता पक्ष व आरएसएसच्या विचारधारेच्या विरोधात देशभर एकच पक्ष सामना करू शकतो तो म्हणजे काँग्रेस पक्ष आणि त्यामुळे जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

देशभरातील १४० भारतयात्रींमध्ये या पदयात्रेत राहुलजी गांधी यांच्याबरोबर कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत सहभागी आहेत. महाराष्ट्रातील ९ भारतयात्री सहभागी आहेत. डॉ.  मनोज उपाध्याय, नवी मुंबई, नंदा म्हात्रे, रायगड, आतिषा पैठणकर, नाशिक, रोशनलाल बिट्टू, चंद्रपूर, पिंकी राजपूत, नागपूर, प्रेरणा गौर, चंद्रपूर, श्रवण रपनवाड, नांदेड, महेंद्र बोहरा, नागपूर व वैष्णवी भारद्वाज, नागपूर हे भारत यात्री सहभागी आहेत. यांचा परिचय आजच्या पत्रकार परिषदेत करुन देण्यात आला.

यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, भारत जोडो यात्रा निघाल्यापासून भारतीय जनता पक्ष टीका करत गैरसमज पसरवण्याचे काम करत आहे पण त्याकडे फारसे लक्ष देण्याचे गरज नाही. ‘भ्रष्टाचारी लोकांनाच भ्रष्टाचार दिसतो’ असा प्रतिटोला त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना लगावला. पदयात्रेत तरुणांची संख्या लक्षणीय आहे. राहुल गांधी या पदयात्रेच्या माध्यमातून जनतेच्या भावना समजून घेत आहेत. ही मुव्हमेंट आहे इव्हेंट नाही,

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, ही पदयात्रा वेगाने व जनतेच्या मोठ्या प्रतिसादाने पुढे जात आहे. जनतेचा, लोकांचा सहभाग वाढत असून आता ही लोकचळवळ झाली आहे. नांदेड जिल्ह्यात पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. उद्या १० नोव्हेंबर रोजी संध्याकाळी नांदेडमध्ये जाहीर सभा आहे. या सभेला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे हे उपस्थित राहणार आहेत तर ११ तारखेला शिवसेनेचे आदित्य ठाकरे सहभागी होत आहेत. या पत्रकार परिषदेत भारत जोडो यात्रेच्या मराठी गीताचे अनावरण करण्यात आले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी