मुंबई| महाराष्ट्र विधानसभेच्या '१६६ - अंधेरी पूर्व' या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीची मतमोजणी आज रविवार, दिनांक ६ नोव्हेंबर २०२२ रोजी पार पडली. सकाळी 8 वाजेपासून सुरू झालेल्या या मतमोजणी प्रक्रियेत एकूण ६६,५३० मतांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या श्रीमती ऋतुजा रमेश लटके विजयी झाल्या आहेत अशी घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्री.प्रशांत पाटील केली. यावेळी केंद्रीय निवडणूक निरीक्षक देवेश देवल उपस्थित होते. त्यानंतर श्री. पाटील यांनी विजयी उमेदवार श्रीमती ऋतुजा लटके यांना पोटनिवडणुकीत विजयी झाल्याचे प्रमाणपत्र प्रदान केले.
अंधेरी पूर्व' या विधानसभा मतदारसंघाच्या सर्व २५६ केंद्रांवर दिनांक 3 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. या मतदान प्रक्रियेत एकूण ३१.७५ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. आज या मतदानाच्या मतमोजणीस सकाळी ८ वाजता सुरुवात झाली. प्रारंभी टपाली मतमोजणी करण्यात आली. त्यानंतर एकूण १९ फेऱ्यांमध्ये ई.व्ही.एम. द्वारे मतमोजणी करण्यात आली. मतमोजणी केंद्राच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. माध्यमांना मतमोजणी प्रक्रियेची तात्काळ माहिती मिळण्याच्या दृष्टीने माध्यम कक्षही स्थापन करण्यात आला होता.
महाराष्ट्र विधानसभेच्या '१६६ - अंधेरी पूर्व' या मुंबई उपनगर जिल्ह्याच्या विधानसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीत शेवटच्या १९ व्या फेरी अखेर अणि टपाली मतदानातून उमेदवारांना मिळालेली एकूण मते याची आकडेवारी खालील प्रमाणे आहे:
१) श्रीमती ऋतुजा रमेश लटके (पक्ष - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) : ६६,५३०
२) श्री. बाला व्यंकटेश नाडार (पक्ष - आपकी अपनी पार्टी ) : १,५१५
३) श्री.मनोज श्रावण नायक (पक्ष – राईट टू रिकॉल पार्टी) : ९००
४) श्रीमती नीना खेडेकर (अपक्ष ) : १ ,५३१
५) श्रीमती फरहाना सिराज सय्यद (अपक्ष ) : १,०९३
६) श्री.मिलिंद कांबळे (अपक्ष ) : ६२४
७) श्री.राजेश त्रिपाठी (अपक्ष ) : १,५७१
(नोटा : १२,८०६, अवैध मते २२)
एकूण मते : ८६,५७०