मधुमेहाचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी आरोग्यपूर्ण जीवनशैली अत्यावश्यक - जिल्हाधिकारी अभिजित राऊत -NNL

जागतिक मधुमेह दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयात नेत्र तपासणी शिबीर संपन्न  


नांदेड|
संगणकीकरणामुळे बदलेली जीवनशैली ही अधिक एका जागेवर खिळवून ठेवणारी झाली आहे. सतत संगणकावर काम, यात डोळ्यांवर पडणारा ताण, व्यायामाचा अभाव यामुळे मधुमेहासारख्या वाढलेल्या आजाराचे प्रमाण चिंताजनक आहे. आजच्या घडीला भारतात 90 टक्के घरांमध्ये मधुमेहाचे रुग्ण आढळून येतात. आरोग्याच्या दृष्टीने ही आव्हानात्मक बाब ठरली असून, यावर मात करण्याच्यादृष्टिने लोकांनी आपली जीवनशैली अधिक आरोग्यपूर्ण करण्यावर भर दिला पाहिजे, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी व्यक्त केली. 


मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व शासनाच्या थोडेसे माय-बापासाठी या अभियानाअंतर्गत जागतिक मधुमेह दिनाच्या औचित्याने आरोग्य विभागातर्फे मधुमेह रुग्णांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. श्री गुरु गोबिंदसिंघजी जिल्हा रुग्णालय येथे झालेल्या या शिबिरास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नीळकंठ भोसीकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संतोष सिरसीकर, नांदेड येथील नेत्रतज्ज्ञ डॉ. शाम तेलंग, नांदेड नेत्र तज्ज्ञ संघटनेचे सचिव डॉ. आनंद पाटील, राज्य नेत्र तज्ज्ञ संघटनेचे प्रतिनिधी डॉ. विवेक मोतेवार, रेटिना तज्ज्ञ डॉ. विशाल कुलकर्णी, डॉ. माहेश्वरी, डॉ. बुरकुलवार, डॉ. साची कोटलवार, डॉ. रवी अग्रवाल, डॉ. माने,  जिल्हा अंधत्व नियंत्रण अधिकारी डॉ. रोशनी, डॉ. दहाडे, डॉ. आडे, डॉ. विभुते, डॉ. दासरवार, डॉ. पेडगावकर, डॉ. कलंत्री, डॉ. भोरगे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.


मधुमेहाचा थेट परिणाम दृष्टीदोषाशी संबंधीत आहे. याचे संकेत प्रत्येकाला सहज लक्षात येण्यासारखे असून यावर वेळीच खबरदारी घेणे आवश्यक आहे, असे सांगुन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संतोष सिरसीकर यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व शासनाच्या थोडेसे मायबापासाठी या उपक्रमाबाबत माहिती दिली. जागतिक मधुमेह दिनानिमित्त नेत्र तपासणी शिबिरासाठी नांदेड शहरातील खाजगी नेत्रतज्ज्ञांनी स्वत:हून पुढाकार घेऊन यात सहभाग घेतल्याबद्दल त्यांचा गौरव केला. जिल्हा रुग्णालयातर्फे वेळोवेळी असे लोकाभिमूख उपक्रम हाती घेतले असून यात अधिकाधिक नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन डॉ. संतोष सिरसीकर यांनी केले.   

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी