नांदेड| महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत एका पेक्षा एक सरस विषय असलेल्या नाट्य प्रयोगांचे सादरीकरण होत आहे. स्पर्धेच्या सातव्या दिवशी एम.एस. शिवणकर प्रतिष्टान, परभणीच्या वतीने नारायण जाधव लिखित, सुनील ढवळे दिग्दर्शित “यशोधरा” या नाट्य प्रयोगाचे सादरीकरण झाले.
अखिल विश्वाच्या दुख:मुक्तीचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी महन्मंगल सम्यक जिवन मार्गाची शिकवण देणार्या शांतीदूत महाकारुनिक गौतम बुद्ध यांच्या विश्वव्यापी कर्तुत्वाने सामान्यांच्या जीवनाला अत्त दीप भवं च्या मूलमंत्राने अलंकृत केले. समस्त जीव सृष्टीला संस्कारित करणार्या सिद्धार्थाची अर्धांगिनी मात्र परमोच्च त्यागाचे प्रतिक असूनही इतिहासाच्या पानातून उपेक्षित राहिली आहे. याच इतिहाचाच्या पानांना उजाळा देत माता याशोधारेचा त्याग, समर्पण, शौर्य, प्रेम, विनय संस्कार रुजवीत माता याशोधारेचे जिवन “यशोधरा” या नाटकाच्या निमित्ताने रसिक प्रेक्षकांना अनुभवता आले.
यशोधरा हे नाटक दिग्दर्शक दुनील ढवळे यांनी गेल्या वर्षी याच स्पर्धेत सादर केले होते. या वर्षी प्रयोगात अमुलाग्र बदल करत प्रभावी सादरीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला. रवी पुराणीक यांनी आचार्य, देवदत्त, सेनापती हे तिन्ही पात्र साकारण्याची लीलया पार केली. सुनील ढवळे यांनी राजा दंडपाणी आणि तथागताची भूमिका साकारली तर सोनी मुलंगे यांनी यशोधरा(प्रोध),डॉ. वर्षा सेलसुरेकर – महाराणी प्रश्रीता, डॉ. भास्कर गायकवाड- राजा शुद्धोधन, ज्योती धुतमल- महाराणी प्रजापती, साक्षी ढवळे – यशोधरा(किशोरवयीन) यांनी आप आपल्या पात्रांना न्याय देण्याचा प्रयत्न केला तर योगिता खंदारे, मनस्वी ढवळे, राजनंदनी खंदारे, प्रियंका गाढे, संजीव अढागळे, आदित्य ढवळे, अभिजित दिप्यंकर, सिद्धांत सूर्यवंशी, बी.आर.कांबळे, राजा वाकळे, संचीन खंदारे, समीर हानमंते, यश खंदारे, प्रमोद अंभोरे, शेख अजहर यांनी भूमिका साकारल्या.
मीनाक्षी ढवळे आणि प्रमोद अंभोरे यांनी नेपथ्य, राजेंद्र तारे यांनी प्रकाशयोजना, कोमल अदोडे आणि प्रियंका गाडे यांनी रंगभूषा, आदित्य ढवळे यांनी वैशभूषा साकारली तर भूषण गाडे यांनी साकारलेलं संगीत नाटकाची उंची वाढवण्यास प्रभावी ठरली.
दि.२३ नोव्हें. रोजी क्रांती हुतात्मा चॅरिटेबल ट्रस्ट, परभणीच्या वतीने रविशंकर झिंगरे लिखित, दिग्दर्शित “सृजन्मयसभा” या नाट्य प्रयोगाचे सादरीकरण होणार आहे.