वडवणी जि. बीड। पत्रकारांना कधी चाय - बिस्कुट पत्रकार, कधी गोदी मिडिया, तर कधी एचएमव्ही पत्रकार संबोधून जनमानसात पत्रकारांची प्रतिमा मलिन करण्याचा शिस्तबद्ध प्रयत्न काही राजकीय पक्ष करीत असल्याचा आरोप एस.एम.देशमुख यांनी केला आहे..
बीड जिल्हा डिजिटल मिडिया परिषदेचा आज वडवणी येथे मेळावा घेण्यात आला.. त्यात एस.एम बोलत होते..ते म्हणाले, कर्नाटकात दिवाळी भेट म्हणून पत्रकारांना एक लाख रूपये दिले गेले.. आपल्याकडेही पन्नास हजारांची गिफ्ट व्हाऊचर दिली गेली.. न मागता पत्रकारांना मोठ्या रक्कमा देऊन मिधे करायचे आणि दिवाळी भेटीच्या बातम्या स्वतःच बाहेर पेरायच्या... जनमानसात पत्रकारांची प्रतिमा मलीन करण्याचाच हा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले... एकदा पत्रकारांची विश्वासार्हता संपली की आपले काम अधिक सोपे होईल हा राजकारण्यांचा धूर्त डाव असून आपण या सापळ्यात अडकता कामा नये असा इशारा देशमुख यांनी पत्रकारांना दिला..
सध्याचं युग हे डिजिटल मिडियाचं आहे.. मात्र डिजिटल मिडियाला प्रिंट प्रमाणे आपली विश्वासार्हता सिध्द करून जनमानसात आपलं स्थान निर्माण करावं लागेल असं मत देशमुख यांनी व्यक्त केलं.. डिजिटल मिडियाला अधिकृत मान्यता दिली जावी , सरकारी जाहिराती मिळाव्यात आणि या माध्यमातील पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका, अन्य सवलती देखील दिल्या जाव्यात असं मत त्यांनी व्यक्त केलं..
प्रारंभी डिजिटल मिडिया परिषदेच्या बीड जिल्हा शाखेच्या पदाधिकारयांचे तसेच तालुका अध्यक्षांची नियुक्ती पत्रे देशमुख यांच्या हस्ते दिली गेली.. यावेळी राज्य प्रमुख अनिल वाघमारे आणि जिल्हा अध्यक्ष जितेंद्र शिरसाट उपस्थित होते.. मराठी पत्रकार परिषदेच्या वडवणी शाखेचे अध्यक्ष विनायक जाधव यांनी सूत्रसंचालन केले..