देगलूर/नांदेड| नांदेड जिल्ह्यातील देगलूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात सोमवारी सायंकाळी पोलिसांचा बंदोबस्त वाढला. झांजपथके खनानु लागली...ढोल ताशे जोरजोरात वाजू लागले आणि वातावरणात उत्साह शिगेला पोहोचला. देगलूरचे रस्ते गर्दीने फुलले होते. राहुल गांधी यांच्या स्वागताची ही जोरदार तयारी होती. "नफरत छोडो भारत जोडो"चा संदेश देणारी ही पदयात्रा तेलंगणातून महाराष्ट्रात सोमवारी रात्री दाखल झाली.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला काँग्रेस पक्षाच्या निशाणीसह फडकणारे तिरंगी झेंडे, तिरंगी पताका आणि तिरंगी रंगाने चमचमणारी विद्युत रोषणाई, असे देगलूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील वातावरण तिरंगामय झाले होते.. लहान मुले, महिला, तरुण आणि वयोवृद्ध नागरिकांनी रस्त्याच्या बाजूला प्रचंड गर्दी झाली होती... राहुलजी गांधींची एक झलक पाहण्यासाठी मोठी उत्सुकता होती. पदयात्रेच्या मार्गावर उत्साह ओसंडून वाहत होता...सर्वांच्या नजरा राहुलजी गांधींकडे लागल्या होत्या...खेड्यापाड्यातील जनतेसह संपूर्ण नांदेड जिल्हा यात्रेच्या स्वागतासाठी उभा होता, तर पोलिसांचा मोठा फौजफाटा बंदोबस्तासाठी होता.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आकर्षक रोषणाईने आणि तिरंगी पडद्यांनी सजवण्यात आले होते. पुतळ्याच्या चबुताऱ्याखाली सजवलेल्या व्यासपीठावर संत बसवेश्वर महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमांना सजवण्यात आले होते.
पदयात्रेच्या मार्गात प्रत्येक चौकाचौकात, प्रत्येक कॉर्नरला राहुलजी गांधी यांच्या स्वागताचे बॅनर, कटाऊट्स होते. त्यावर कॉग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया गांधी, दिवंगत माजी केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, कॉग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते आणि भारत जोडो यात्रेचे समन्वयक बाळासाहेब थोरात यांच्या प्रतिमा झळकत होत्या.
सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, विश्वजित कदम, माणिकराव ठाकरे, भाई जगताप यांनी सज्जतेचा आढावा घेतला.