नांदेड| नेहरू युवा केंद्राच्या समन्वयाने लोकसभा सचिवालयामार्फत आयोजित 'राष्ट्रीय नेत्यांना श्रद्धांजली' या कार्यक्रमाअंतर्गत नांदेडच्या किरण देशमुखला भारतीय संसदेकडून निमंत्रण आले आहे.
दि. १४ नोव्हेंबर रोजी नेहरू जयंतीनिमित्त लोकसभेत श्रद्धांजलीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमात 'पंडीत नेहरु: जीवन विचार आणि योगदान' या विषयावर भाषण करण्यासाठी किरणची निवड झाली आहे. फेब्रुवारी २०२२ मधे आयोजित राज्य युवा संसदेत केलेल्या प्रभावी भाषणावरून त्याची निवड करण्यात आली असून, भाषणासाठी निवड झालेला तो महाराष्ट्रातील एकमेव विद्यार्थी आहे. या कार्यक्रमासाठी येणारा विमानप्रवास तसेच इतर सर्व खर्च देखील लोकसभा सचिवालयामार्फतच करण्यात येणार आहे.
किरणने यापूर्वी सुध्दा भाषणाच्या माध्यमातून बराच नावलौकिक कमावला आहे. राज्य अन् देशपातळीवरील विविध वक्तृत्व स्पर्धांमध्ये त्याने पारितोषिके पटकावली असून युवक मंत्रालय, भारत सरकार आयोजित 'राष्ट्रीय युवक महोत्सवात' त्याने सलग २ वेळा रजत पदक प्राप्त केले आहे तसेच 'दक्षिण आशियाई आंतरराष्ट्रीय युवक महोत्सवात' सुध्दा त्याने आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.
जानेवारी २०२१ मध्ये दिल्लीतील प्रसिद्ध विज्ञान भवन येथे भारतीय छात्र संसदेत केलेले त्याचे भाषण देशभरात विषेशत्वाने गाजले होते.नांदेड जिल्ह्यातील चिदगिरी हे लहानशे गाव किरणचे मूळ गाव असून वडील शेतकरी व घरची परिस्थिती सुध्दा सर्वसामान्यच आहे. त्याने एम जी एम महाविद्यालयातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. तो सध्या भारतीय डाक विभागात नोकरीस कार्यरत असून, किरणने आजपर्यंत वक्तृत्व अन् कर्तृत्वाच्या बळावर घवघवीत यश संपादन केले आहे. सामान्य शेतकऱ्याच्या पोराचा आवाज आता देशाचे सर्वोच्च सभागृह असणाऱ्या भारतीय संसदेतही घुमणार, याबद्दल सर्व स्तरांतून त्याचे कौतुक होत आहे.