नांदेड| हौशी मराठी नाट्य स्पर्धेची चुरस आता वाढत आहे. एका पेक्षा एक सरस अश्या नाट्य प्रयोगांचा आनंद रसिक प्रेक्षकांना घेता येत आहे. स्पर्धेच्या पाचव्या दिवशी राजीव गांधी युवा फोरम, परभणीच्य वतीने रविशंकर झिंगरे लिखित, अनुजा डावरे दिग्दर्शित “दुसरा अंक” या नाट्य प्रयोगाचे सादरीकरण झाले. एका सृजनशील लेखकाची होणारी मानसिकता, ओढाताण रविशंकर झिंगरे यांनी अतिशय उत्तमरीत्या मांडलेली आहे.
घरी आजारी बायको, नोकरी करत असलेली बँक शेवटच्या घटका मोजत आहे, गावाकडे वडिलांना मनी ऑर्डर करायची आहे आणि एकीकडे नाटकाचा दुसरा अंक लिहायचे आहे. स्वतःला मुल होणार नाही हे माहित असताना त्यांची बायको त्यांनी लिहिलेल्या नाटकालाच आपले आपत्य मानते हा प्रसंग दाद मिळवून जाते. बायकोच्या आजारपणासाठी पैसे हावे असतात. आणि अश्यातच नाथा हा त्याचा वैवसाईक मित्र भेटतो आणि त्याच्या सांगण्यावरून मनाविरुद्ध फक्त पैशासाठी व्यावसाईक पद्धतीने लिखाण करू लागतो. खूप पैसा मिळतो पण सृजनशील लेखकाची मात्र कौंडी होत असते. हीच कोंडी या नाटकातून दर्शविण्यात आली आहे.
या नाटकातील उल्हास कोळी या भूमिकेसाठी किशोर पुराणीक यांनी अभिनयाचे पारितोषिक मिळवले होते. आणि या वेळेस हे पात्र प्रकाश बारबिंड यांनीही पूर्ण ताकदीनिशी साकारण्याचा उत्तम प्रयत्न केला. त्र्यंबक वडसकर यांनी साकारलेले जयराम आणि संपदा झाडगांवकर यांनी साकारलेली नेत्रा कोळी यांची भूमिका लक्षवेधी ठरली. सौरभ कुरुंदकर यांनी साकारलेला नाथा, प्रशांत जाधव, विश्वजित जोशी यांनी आप आपल्या पात्रांना न्याय देण्याचा प्रयत्न केला.
या नाटकाचे त्र्यंबक वडसकर आणि सरोज पांडे यांनी साकारलेलं नेपथ्य सूचक आणि आशयपूर्ण होते. धनश्री देऊळगावकर आणि वेदांत बारबिंड यांची प्रकाशयोजना, रिया पुराणिक आणि साक्षी बारबिंड यांचे संगीत नाटकाची उंची वाढवते. रेवती पांडे आणि निर्मला वडसकर यांनी रंगभूषा आणि वेशभूषा सांभाळली तर रंगमंच व्यवस्था – प्रमोद बल्लाळ, श्रीकांत कुलकर्णी, दिनकर जोशी, अनिल पांडे, बंडू जोशी, प्रथमेश जोशी, संतोष पांडे, प्रशांत बारबिंड, आदित्य पांडे, अंजली कुलकर्णी, शौनक पांडे, कुमार पुराणिक, शेख सलीम शेख पाशा तांबोळी, शैलजा पांडे, शोभा पुराणिक यांनी सांभाळली.
दि. २१ नोव्हे. रोजी एम.एस. शिवणकर प्रतिष्टान, परभणीच्या वतीने नारायण जाधव लिखित सुनील ढवळे दिग्दर्शीत “यशोधरा” या नाट्य प्रयोगाचे सादरीकरण होणार आहे.